कदम-देशमुखांचा दबदबा कायम

By Admin | Updated: May 13, 2015 00:53 IST2015-05-12T23:12:02+5:302015-05-13T00:53:13+5:30

जिल्हा बँक : कडेगावमध्ये नेत्यांच्या विजयाने दोन्ही गटांना दिलासा

Kadam-Deshmukh's dominance continues | कदम-देशमुखांचा दबदबा कायम

कदम-देशमुखांचा दबदबा कायम

प्रताप महाडिक - कडेगाव तालुक्यात माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यातील परस्परविरोधी राजकीय सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातून मोहनराव कदम यांच्याविरोधात पृथ्वीराज देशमुख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते धोंडिराम महिंद यांनी निवडणूक लढविली. यात मोहनराव कदम यांनी बाजी मारली. दुसरीकडे संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनीही ग्राहक, गृहनिर्माण, मजूर संस्था गटावरील पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. मोहनराव कदम व संग्रामसिंह देशमुख या दोन्ही दिग्गज नेत्यांनी संबंधित गटावर दबदबा कायम ठेवला आहे.
कडेगाव सोसायटी गटात कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. येथे मोहनराव कदमच विजयी होणार, याची खात्री सर्वांनाच होती. प्रत्यक्षात निकालही तसाच लागला. मोहनराव कदम यांना ५१, तर धोंडिराम महिंद यांना ११ मते मिळाली. जिल्हास्तरावर रयत परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व करणारे मोहनराव कदम यांना त्यांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. परंतु रयत परिवर्तन पॅनेलच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी मात्र परिश्रम घ्यावे लागले.
रयत परिवर्तन पॅनेलला मिळालेल्या सहा जागा आणि काही दिग्गज विरोधकांना दिलेला पराभवाचा धक्का, यामुळे कदम गटाला दिलासा मिळाला आहे.
संग्रामसिंह देशमुख यांनी ग्राहक, गृहनिर्माण मजूर संस्था गटातून सर्वाधिक २३४ मते मिळवून या गटावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. त्यांचे मजूर संस्थांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि शेतकरी सहकार पॅनेलची मोठी शक्ती संग्रामसिंह देशमुखांना मोठ्या फरकाने विजय मिळविण्यासाठी उपयुक्त ठरली. यामुळे देशमुखांचा या गटावरील दबदबा कायम राहिला. कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संग्रामसिंह देशमुखांच्या विजयाचा जल्लोष केला. एकंदरीत, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणूक निकालाने कदम-देशमुख या दोन्ही परस्परविरोधी गटांमध्ये आपापल्या नेत्यांच्या विजयाचा आनंद दिसत आहे.

संग्रामसिंह देशमुखांना संधीची शक्यता
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शेतकरी पॅनेलच्या अनेक दिग्गज नेत्यांनी विजय मिळवून संचालक मंडळात स्थान निर्माण केले आहे. आता पाच वर्षांमध्ये अनेकांना अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे. यात संग्रामसिंह देशमुख यांना निश्चितपणे संधी मिळणार, अशी चर्चा आहे.
मोहनराव पाचव्यांदा संचालक
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकांत मोहनराव कदम तीनवेळा बिनविरोध, तर दोनवेळा निवडणूक जिंकून संचालक झाले. इतका प्रदीर्घ कालावधी संचालक म्हणून कार्यरत असणारे ते एकमेव नेते आहेत.

Web Title: Kadam-Deshmukh's dominance continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.