नव्या ट्रॅक्टरखालीच गेला जीव !

By Admin | Updated: July 24, 2015 00:38 IST2015-07-24T00:29:05+5:302015-07-24T00:38:18+5:30

सिद्धेवाडीतील घटना : शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ; शिकत असताना ताबा सुटून अपघात

Junk went under the new tractor! | नव्या ट्रॅक्टरखालीच गेला जीव !

नव्या ट्रॅक्टरखालीच गेला जीव !

सावळज : कष्टातून फुलवलेल्या द्राक्षबागेसाठी मोठ्या हौसेने ट्रॅक्टर आणला, पेढे वाटले आणि दुसऱ्या दिवशी त्याच ट्रॅक्टरने ‘त्यांचा’ जीव घेतला! सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील ही घटना अवघ्या परिसराच्या काळजाला चटका लावून गेली.
भानुदास पांडुरंग शिंदे (वय ६५) हे त्या शेतकऱ्याचे नाव. गुरुवारी दुपारी नवाकोरा ट्रॅक्टर शिकत असताना त्यावरील ताबा सुटून तो शेजारच्या कालव्यात जाऊन उलटला. त्याखाली सापडून शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
सिद्धेवाडी येथील आतकी मळा परिसरातील भानुदास शिंदे यांची साडेतीन एकर द्राक्षबाग आहे. कष्टाळू व जिद्दी शेतकरी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे सारे कुटुंबच शेतीत रमले आहे.
द्राक्षबागेवर औषध फवारण्यासाठी व शेतीच्या कामांसाठी त्यांनी बुधवारी सांगली येथून नवीन ट्रॅक्टर खरेदी करून आणला होता. सगळे घर आनंदात न्हाऊन निघाले होते. संध्याकाळी नव्या ट्रॅक्टरची पूजा केली. पेढेही वाटले.
ट्रॅक्टर आणला खरा; पण तो चालवण्यास येत नसल्याने भानुदास शिंदे यांनी शिकण्याचा निर्धार केला. गुरुवारी दुपारी घराजवळच्या माळावर त्यांनी ट्रॅक्टर शिकण्यास सुरुवात केली; पण ट्रॅक्टरचा अंदाज न आल्यामुळे गांगरून जाऊन अचानक ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला गेला.
ट्रॅक्टरने वेग घेतला आणि जवळच असलेल्या सिद्धेवाडी तलावाच्या पोटकालव्यामध्ये तो दोनवेळा उलटला. ट्रॅक्टरखाली सापडल्यामुळे शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार बघितल्यानंतर नातेवाईक पळत आले. शिंदे बेशुद्ध पडले असतील, असे समजून सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शिंदे यांची पत्नी, दोन मुले आणि दोन मुलींवर आभाळच कोसळले. दोन्ही मुलींची लग्ने झाली असून, एक मुलगा बाहेरगावी नोकरीस आहे, तर दुसरा शेती करतो. (वार्ताहर)

Web Title: Junk went under the new tractor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.