पत्रकारांनी ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:51+5:302021-01-08T05:28:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आधुनिक काळात माहितीचा मोठा खजाना आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे. त्याचा सकारात्मक वापर करून पत्रकारांनी ...

Journalists should broaden their knowledge | पत्रकारांनी ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात

पत्रकारांनी ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आधुनिक काळात माहितीचा मोठा खजाना आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे. त्याचा सकारात्मक वापर करून पत्रकारांनी त्यांच्या ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात, असे आवाहन ''''लोकमत''''चे संपादक वसंत भोसले यांनी केले.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने येथील वृत्तपत्र विक्रेता भवनात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, ''''लोकमत'''' चे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, माध्यम क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले. हे बदल स्वीकारत पत्रकार पुढे जात असले तरी ज्ञानग्रहणातही पुढे जाणे आवश्यक आहे. आधुनिक साधनांशिवाय ज्या काळी पत्रकारिता केली जात होती, त्यावेळी माहिती मिळविणे हे खूप जिकिरीचे काम होते. आता माहितीची उपलब्धता सहज होत आहे. त्यावर अभ्यास करून योग्य-अयोग्यतेची पडताळणी करून ती माहिती समाजासमोर मांडली पाहिजे.

पत्रकारिता करताना नकारात्मकता बाजुला केली पाहिजे. आपल्यासमोर ज्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्या मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या पिढीने ज्ञान आत्मसात करून अभ्यासू वृत्ती जपली नाही, तर मुद्रित माध्यमांची सुदृढ परंपरा पुढे नेणे कठीण होईल. त्यामुळे सध्या कार्यरत पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. तांत्रिक बदल स्वीकारताना सामाजिक, राजकीय, भौगोलिक बदलांबाबतही सतर्क राहणे, त्याचे भान ठेवणे या गोष्टीही गरजेच्या आहेत.

समाजाच्या अडचणी, समस्या व त्यांच्या वेदना मांडण्याबरोबरच त्या कशा व कोणत्या मार्गाने साेडविता येतील, हे पत्रकारांनी दाखवून देणे आवश्यक आहे.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले की, पत्रकारांनी समाजातील नकारात्मक घटनांना अधिक महत्त्व, वातावरण अधिक दूषित तर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी. समाजाला काय आवश्यक आहे, योजनांची अंमलबजावणी करताना काय त्रुुटी येत आहेत, हे दाखवून दिले पाहिजे.

बलराज पवार यांनी स्वागत, संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले. विकास सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी कार्याध्यक्ष समाधान पोरे, जालिंदर हुलवान, गणेश कांबळे, आदी उपस्थित होते. धनंजय पाठक यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Journalists should broaden their knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.