नोकरी गेली, लग्न कसे जमणार?, कोरोना झाला तर खर्च कसा पेलणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:35+5:302021-05-10T04:25:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अवघ्या मानवजातीला कवेत घेतलेल्या कोरोनाने शारीरिक व्याधींसोबतच असंख्य मानसिक प्रश्नही निर्माण केले आहेत. समाजाचा ...

नोकरी गेली, लग्न कसे जमणार?, कोरोना झाला तर खर्च कसा पेलणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अवघ्या मानवजातीला कवेत घेतलेल्या कोरोनाने शारीरिक व्याधींसोबतच असंख्य मानसिक प्रश्नही निर्माण केले आहेत. समाजाचा सामाजिक, आर्थिक समतोल ढासळल्याने अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. आर्थिक ताण, भविष्याची काळजी, आजारांविषयीची भीती, समज-गैरसमज यामुळे मानसिक आजारपण वाढत आहे.
वाढती व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद-विवाद याबरोबरच कोरोनापश्चात रुग्णांमध्ये आत्महत्येचे विचार असे काही चिंताजनक अनुभव मानसोपचार तज्ज्ञांसमोर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने इस्लामपुरातील सुश्रुषा संस्थेच्या मदतीने ‘विश्वास कोरोनाशी लढण्याचा’ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार ६५.५० टक्के रुग्णांमध्ये उदासिनता, ५७.५० टक्के रुग्णांमध्ये चिडचिडेपणा, ५५ टक्के रुग्णांमध्ये कशातही आनंद न वाटणे, ५४.७० टक्के लोकांत क्रोधभावना तर ५० टक्के रुग्णांत चिंता व काळजी या मानसिक त्रासांची तीव्र लक्षणे दिसून आली. ताणतणाव, भीती, नैराश्य, भविष्याविषयी काळजी या मानसिक विकारांचे प्रमाण वाढले आहे.
मागील लॉकडाऊननंतरच्या परिस्थितीला तोंड देता आले नसल्याने अनेकजण आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचीही निरीक्षणे आहेत. हेल्पलाईनच्या समुपदेशकांनी त्यांना परावृत्त करण्यात यश मिळविले. कोरोना मुक्तीनंतरचा शारीरिक व मानसिक थकवा, आर्थिक नुकसानीने आलेला ताण, वाईट स्वप्ने पडणे, निराशेकडे झुकणारे सततचे विचारचक्र, एकटेपणा, अस्वस्थता, सतत आजारी असल्याची भावना, असहाय्यता, नातेसंबंधातील कटुता इत्यादी तक्रारी वाढल्याचे मानसोपचार तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
चौकट
महिला सर्वाधिक तणावात
हेल्पलाईनवर येणाऱ्या कॉलनुसार महिला सर्वाधिक तणावात असल्याचे आढळले. अर्थार्जन थांबलेल्या कर्त्या पुरुषांकडून महिलांवर राग काढण्याचे प्रमाण वाढले आहे. एरवी दिवसभर कामावर असणारे पुरुष घरातच थांबल्यानेही ताणतणाव वाढले आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रवास थांबल्याने महिला वर्ष-दीड वर्ष माहेरी जाऊ शकल्या नाहीत, त्यामुळे व्यक्त होता न आल्याने त्यांची घुसमट सुरू आहे.
चौकट
पुरुषांची हृदये व्यक्त होताहेत!
- एरवी दगडासारखी समजली जाणारी पुरुषांची हृदयेदेखील कोरोना काळात व्यक्त होऊ लागली आहेत. नोकरी गेल्याने किंवा वेतन कपात झाल्याने त्यांना भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे.
- नोकरीसाठी वर्षानुवर्षे पुण्या-मुंबईसह बाहेरगावी असणारे पुुरुष गावाकडे येताच सुरुवातीला कौतुकाचे ठरले. आता मात्र त्यांना कधी एकदा जाताय? अशा प्रश्नार्थी नजरांचा सामना करावा लागत आहे.
- भविष्यासाठी पैशांचे व्यवस्थापन करणे त्यांच्यासाठी जिकिरीचे ठरत आहे. कुटुंबावर कोरोनाने हल्ला केलाच तर कसे तोंड द्यायचे ही भीती कर्त्या पुरुषांना ग्रासून राहिली आहे.
चौकट
तरुणांपुढे समस्या लग्नाची!
- कोरोनाच्या आजारातून बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींना लग्नाची समस्या मन पोखरते आहे. आपल्या आजारामुळे जोडीदार मिळेल की नाही ही चिंता सतावते आहे. लाॅकडाऊनमुळे विवाह लांबल्यानेही ते अस्वस्थ आहेत.
- शासनाने परीक्षेत पास केले, पण नोकऱ्या कुठे शोधायच्या हादेखील मोठा प्रश्न तरुणांपुढे आहे. शेतातील काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या तरुणाईला थंडावलेल्या मार्केटचा सामना करावा लागत आहे.
- लॉकडाऊनमध्ये घरातच कोंडल्या गेलेल्या प्रेमवेड्या तरुण-तरुणींना आता मोबाईलवर आभासी प्रेमात आनंद मानावा लागत आहे. यामुळे वाढणारे मानसिक ताणही मानसोपचार तज्ज्ञांसमोर येत आहेत.
चौकट
हरवलेला रोजगार आणि बंद झालेले अर्थार्जन
- शहरी भागात उद्योग, व्यवसायांची टाळेबंदी झाल्याने हजारो लोकांना रोजगार हरवला आहे. अर्थार्जन थांबल्याने कौटुंबिक कलह वाढताहेत.
- मोठ्या शहरांत रोजगारबंदीने गावाकडे परतलेल्यांना नव्या रोजगाराच्या वाटा अद्याप सापडलेल्या नाहीत, त्यामुळे तेदेखील तणावात आहेत.
- पुण्या-मुंबईची क्रेझ कमी झाली आहे. अनेक तरुणांना तिकडे नोकरीसाठी जाण्याला कुटुंबातूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे.
पॉईंटर्स
गेल्या वर्षभरात हेल्पलाईनवर आलेले कॉल - ९०००
महिला - ६०००
पुरुष - ३०००
कोट
कोरोनाकाळात समाजात भविष्याची चिंता वाढल्याचे महत्त्वाचे निरीक्षण आहे. कोरोना झाला तर उपचारांसाठी पैसे कोठून आणायचे? बेड मिळेल की नाही? अशी अस्वस्थता वाढली आहे. दीड वर्षांपासून घरातच राहिल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत. आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाचे मानसिक विकारांकडे लक्षच नाही.
- कालिदास पाटील, मानसोपचारतज्ज्ञ