शासकीय आरोग्य विभागात नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे

By Admin | Updated: May 8, 2015 00:20 IST2015-05-07T23:10:17+5:302015-05-08T00:20:11+5:30

मिरजेतील प्रकार : बेरोजगारांची पोलिसात तक्रार

Job bogus appointments in government health department | शासकीय आरोग्य विभागात नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे

शासकीय आरोग्य विभागात नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे

मिरज : महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे मराठी कॉल सेंटर या नावाने ग्रामीण भागातील तरूणांना शासकीय नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे भामट्यांनी पाठविली आहेत. टेलिफोन आॅपरेटर म्हणून नोकरीसाठी १३ हजार रूपये अनामत रक्कम जमा करण्याच्या नवसंजीवनी नावाच्या बोगस योजनेबाबत बेरोजगार तरूणांनी पोलिसात तक्रार केली आहे.
बेडग येथील सचिन लिंबीकाई, अनिल बस्तवडे यांसह बेरोजगार तरूणांना महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे संजीवन योजनेत दरमहा २५ हजार वेतनावर टेलिफोन आॅपरेटरच्या नियुक्तीची पत्रे पाठविण्यात आली आहेत. टेलिफोन आॅपरेटर म्हणून नियुक्तीसाठी १३ हजार ५०० रूपये अनामत रक्कम भरण्याची सूचना देण्यात आली आहे. कोळवा बीच रोड, गोवा असा पत्ता असलेल्या संस्थेच्या बँक खात्यावर अनामत रक्कम भरणाऱ्यांनाच टेलिफोन आॅपरेटरची नोकरी देण्यात येणार आहे. दूरध्वनीद्वारे झालेल्या मुलाखतीत नोकरीसाठी निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
पत्रे मिळालेल्या तरूणांना संजीवन योजनेचे प्रतिनिधी मोबाईलवर संपर्क साधून नोकरीसाठी अनामत रक्कम भरली काय?, कधी भरणार आहात? अशी विचारणा करीत आहेत. मात्र नियुक्तीपत्र मिळालेल्या बेरोजगार तरूणांनी कोणतीही मुलाखत दिली नसल्याने ते संभ्रमात आहेत.
काही तरूणांनी आ. सुरेश खाडे यांना नियुक्तीपत्रे दाखविल्यानंतर आ. खाडे यांनी या बोगस नियुक्तीपत्राबाबत पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला. नोकरीसाठी पाठविण्यात आलेल्या बोगस नियुक्तीपत्राची दखल घेऊ नका असे सांगून पोलिसांनी बेरोजगार तरूणांना पिटाळून लावले. मात्र बोगस नियुक्तीपत्राद्वारे भामट्यांकडून ग्रामीण भागातील तरूणांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी रेल्वेत नोकरीसाठी बोगस नियुक्तीपत्रे पाठवून बेरोजगारांची फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Job bogus appointments in government health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.