बोरगावमधून जितेंद्र पाटील हॅट्ट्रिकच्या तयारीत

By Admin | Updated: December 22, 2016 00:08 IST2016-12-22T00:08:08+5:302016-12-22T00:08:08+5:30

जयंत पाटील यांना आव्हान : विकास आघाडीची भूमिका निर्णायक; गड काबीजसाठी जोरदार तयारी

Jitendra Patil started the hat-trick from Borgaon | बोरगावमधून जितेंद्र पाटील हॅट्ट्रिकच्या तयारीत

बोरगावमधून जितेंद्र पाटील हॅट्ट्रिकच्या तयारीत

नितीन पाटील ल्ल बोरगाव
वाळवा तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसकडून उमेदवारीचे दावेदार म्हणून जितेंद्र पाटील यांचे एकमेव नाव आहे. यावेळी ते तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्ट्रिक करणार, की त्यांची घोडदौड रोखण्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यशस्वी होणार, याकडे जिल्ह्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दुसरीकडे खा. राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील हे विकास आघाडीच्या माध्यमातून बोरगावचा गड काबीज करण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
बोरगाव जिल्हा परिषद गट खुला आहे, तर पंचायत समितीचा बोरगाव गण ओबीसी पुरुष गटासाठी आरक्षित आहे आणि ताकारी गण मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित आहे.
जिल्हा परिषदेसाठी अनेकांनी शड्डू ठोकला आहे. मात्र काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षातून हुकमी उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. काँग्रेसमधून रणधीर पाटील व अपक्ष म्हणून मिलिंद पाटील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत.
राष्ट्रवादीतून राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, ‘कृष्णा’चे माजी संचालक उदयसिंह शिंदे, उपसरपंच विकास पाटील, ‘महानंद’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचे पुत्र विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. वैभव जलसिंचन योजनेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी, निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
भाजपमधून बोरगाव हायस्कूलचे अध्यक्ष संजय पाटील, शेतकरी संघटनेकडून प्रसाद पाटील (बहे), भास्कर कदम (मसुचीवाडी) यांनीही इच्छुक असल्याचे सांगितले आहे. बोरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीतर्फे सरपंच प्रकाश वाटेगावकर, माजी सरपंच अविनाश खरात (खरातवाडी), सुभाष हुबाले (हुबालवाडी), तर काँग्रेसकडून अ‍ॅड. विजय खरात (खरातवाडी), सचिन सलगर (बोरगाव) यांची नावे चर्चेत आहेत. ताकारी गण मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथून अजून तरी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झालेली नाही.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे बोरगाव हे दत्तक गाव आहे. या जिल्हा परिषद गटात जयंत पाटील यांचे वर्चस्व २५ वर्षे अबाधित होते. मात्र २00६-0७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फायदा उठवत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर २0१२ च्या निवडणुकीत खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षण पडले होते. त्यावेळी पाटील यांनी पत्नी सौ. जयश्री पाटील यांना विजयी करुन पुन्हा एकदा राष्ट्रवादीला चपराक दिली.
यावेळी हा मतदारसंघ पुन्हा एकदा खुला झाला आहे. त्यामुळे जितेंद्र पाटील यांनी जय्यत तयारी करुन विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र यावेळी कसल्याही परिस्थितीत बोरगावचा गड सर करायचाच, यासाठी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. आ. पाटील कोणते अस्त्र बाहेर काढणार, याबाबतही चर्चा आहे.
बोरगाव गटात ३२ हजार ५४५ मतदान आहे. या मतदारसंघात बोरगाव, ताकारी, बहे, खरातवाडी, दुधारी, मसुचीवाडी, फार्णेवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, गौंडवाडी व जुनेखेड ही गावे आहेत. मतदार संघाच्या पुनर्रचनेत या गटातील नवेखेडचा समावेश वाळवा गटामध्ये करण्यात आला आहे.
खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील यांनी विकास आघाडी करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. यासाठी त्यांच्या बैठकाही झाल्याचे समजते. येथे आघाडीचा उमेदवार आल्यास निवडणूक तिरंगी होणार आहे. याचा फटका कोणाला बसणार, हे निवडणुकीतच ठरणार आहे.
मसुचीवाडी प्रकरण कळीचा मुद्दा
मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील महाविद्यालयीन युवतीचे छेडछाड प्रकरण, तसेच खेड येथील युवकांकडून झालेली मारहाण यामुळे निवडणुकीवर परिणाम होणार आहे. मसुचीवाडी येथील ग्रामस्थांनी तर गावातील मुलीला झालेल्या त्रासाला कंटाळून मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता. दोन्ही गावांतील मतदारांचे मतपरिवर्तन करण्यात नेते यशस्वी होणार का?, यावरही निवडणुकीचा निकाल निर्णायक ठरणार आहे.

Web Title: Jitendra Patil started the hat-trick from Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.