कवठेमहांकाळमध्ये आर्चीसाठी तरु णाईचे ‘झिंगाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 02:26 IST2016-05-10T02:19:14+5:302016-05-10T02:26:49+5:30

गर्दी सैराट : पोलिसांकडून सौम्य लाठीमार; उद्घाटनाच्या कार्यक्रमातही अडचणी

'Jhingat' for young girl in Kavteemahal | कवठेमहांकाळमध्ये आर्चीसाठी तरु णाईचे ‘झिंगाट’

कवठेमहांकाळमध्ये आर्चीसाठी तरु णाईचे ‘झिंगाट’

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ अवघ्या महाराष्ट्रातील युवावर्गाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सोमवारी गर्दीचा ‘सैराट’ प्रयोग पाहायला मिळाला. पोलिस बंदोबस्तातही गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर ‘सैराट’वर स्वार
झालेली तरुणाई अक्षरश: झिंगाट झाली.कवठेमहांकाळ (जि.सांगली) येथे सोमवारी एका कापड दुकानाचे उद्घाटन रिंकू राजगुरू हिच्या हस्ते ठेवण्यात आले होते. गावात आर्ची येणार, ही बातमी आठवडाभर सोशल मीडियावरून अगोदरच पसरली होती. आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सकाळपासूनच सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जत, मिरज, आटपाडी, कर्नाटकातून अनेक तरु णांनी हजेरी लावली होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता रिंकू कार्यक्रमाच्या ठिकाणी आली असता, युवावर्गाने प्रचंड गर्दी केल्याने रिंकूला गाडीतून उतरणेही कठीण झाले. यावेळी गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर रिंकूला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी व तिच्या खासगी रक्षकांनी आणले. तोपर्यंत संपूर्ण गर्र्दी ‘सैराट’मय होऊन ‘झिंग, झिंग, झिंगाट’च्या तालात नाचत होती.
गर्र्दी प्रचंड झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करूनही गर्दीला आटोक्यात आणता आले नाही. अर्ध्या तासात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना गर्दीला पांगविण्यासाठी मोठी
कसरत करावी लागली. यावेळी रिंकू राजगुरूला मोठ्या प्रयत्नाने
पोलिसांनी गर्दीतून वाट काढून देत शहरातून सुखरूप बाहेर काढले.
तिची गाडी गर्दीतून बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.
शटरबंद उद्घाटन
एखाद्या दुकानाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याचे शटर लगेचच बंद केल्याची घटना कधीच घडल्याचे ऐकिवात नाही; पण सोमवारी रिंकू राजगुरूच्या चाहत्यांच्या अनियंत्रित गर्दीने हा प्रकारही घडविला. गर्दी आवाक्याबाहेर गेल्यानंतर उद्घाटन झालेले कापड दुकान अक्षरश: बंद करावे लागले. रिंकू दुकानात आल्यानंतर शटर बंद करूनच उद्घाटनाचा उर्वरित कार्यक्रम उरकावा लागला.
आरसा आणि आठवण
‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे अभिनेत्री रिंकूच्या मोटारीचा आरसा फुटला. मात्र, तिच्या चाहत्यांनी तुटलेल्या आरशाचा काचा मिळेल तशा उचलून तिची आठवण म्हणून अनेकांनी जवळ ठेवून घेतल्या. (वार्ताहर)

एका छबीसाठी...
रिंकूची एक छबी टिपण्यासाठी गर्दीतील प्रत्येकजण उतावीळ झाला होता. रिंकूने स्टेजवर येऊन हात उंचावल्यानंतर तरुणाईने एकच जल्लोष केला आणि पटापट मोबाईल कॅमेरे बाहेर आले. तिची एक छबी टिपण्यासाठी प्रत्येकाची घाई सुरू होती.
 

Web Title: 'Jhingat' for young girl in Kavteemahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.