म्हैसाळच्या आरोग्य केंद्राची झाडाझडती
By Admin | Updated: November 22, 2014 00:02 IST2014-11-21T23:26:20+5:302014-11-22T00:02:50+5:30
ग्रामस्थांच्या तक्रारी : कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

म्हैसाळच्या आरोग्य केंद्राची झाडाझडती
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर, ते मुख्यालयात राहात नाहीत, रूग्णालयातील कामकाजाकडे दुर्लक्ष करतात यांसह अनेक कारणांचा ठपका ठेवून, ‘तुम्हाला निलंबित का करू नये?’, अशी नोटीस त्यांना जिल्हा परिषदेतून पाठविण्यात आली आहे. नोटिसीला उत्तर आल्यानंतर संबंधितावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहात नाहीत, रूग्णांना चांगली सेवा दिली जात नाही, यांसह ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या. म्हणूनच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एका पथकाने शुक्रवारी म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आंबी उपस्थित होते, परंतु ते रूग्णालयात राहात नाहीत. दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार खंदारे आरोग्य केंद्रात उपस्थित नव्हते. औषध निर्मात्या माधुरी पाटील गैरहजर होत्या, तर आरोग्य सेवक एस. बी. आंबी यांचेही काम समाधानकारक नसल्याचे दिसून आले. चौकशीसाठी गेलेल्या पथकाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांना अहवाल दिला आहे. त्यानुसार संबंधित आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबी, डॉ. खंदारे, आरोग्य सेविका आंबी, औषध निर्मात्या पाटील यांना, ‘तुम्हाला निलंबित का करू नये?’, अशी नोटीस बजाविली आहे.
या नोटिसीला आठ दिवसात उत्तर देण्याची सूचना दिली आहे. या कालावधित उत्तर न आल्यास संबंधितांना निलंबित करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
रुग्णालयातील कामकाजाकडे दुर्लक्ष
म्हैसाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आणि दोन कर्मचारी आहेत. ते मुख्यालयात राहात नाहीत. रूग्णालयातील कामकाजाकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहात नाहीत. रूग्णांना चांगली सेवा दिली जात नाही, यांसह ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या.