काँग्रेस इच्छुकांशी जयश्रीताईंची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:15+5:302021-02-05T07:22:15+5:30
सांगली : महापौर निवडीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर ...

काँग्रेस इच्छुकांशी जयश्रीताईंची चर्चा
सांगली : महापौर निवडीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर यांनी गुरुवारी नेत्या जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. यावेळी महापौर निवडीवर चर्चा करण्यात आली. काँग्रेसकडून स्वत: साखळकर व नगरसेवक मंगेश चव्हाण इच्छुक आहेत.
महापालिकेत पुढील महिन्यात महापौर निवड होणार आहे. हे पद आता खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या वाढत आहे. भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महापौर निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बावडेकर स्वत: महापौर पदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासह नगरसेवक धीरज सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, निरंजन आवटी आदींची नावे सत्ताधाऱ्यांकडून आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीकडून गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, दिग्वीजय सूर्यवंशी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये उत्तम साखळकर व मंगेश चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.
काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांची उत्तम साखळकर व अमर निंबाळकर यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी महापौर निवडीबाबत चर्चा झाली. साखळकर यांनी आपण स्वत: इच्छुक असल्याचे सांगितले. याशिवाय पक्षातील अन्य इच्छुकांची नावेही सांगितली. मात्र याबाबत पाटील यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. पक्षातील अन्य नेते, नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करून महापौर निवडीबाबत भूमिका ठरवणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.