जयंतरावांपुढे रघुनाथदादांचा फुसका बार!
By Admin | Updated: May 22, 2015 00:08 IST2015-05-21T23:24:55+5:302015-05-22T00:08:44+5:30
शेतकरी संघटनेचे चौघेच रिंगणात : राजारामबापू कारखाना निवडणुकीचा फार्स; लाखो रुपयांचा चुराडा

जयंतरावांपुढे रघुनाथदादांचा फुसका बार!
अशोक पाटील - इस्लामपूर -माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जयंत पाटील गटाचे १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी चार उमेदवार उभे करून तोकडे आव्हान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणून हा केवळ फार्स ठरणार असल्याने, प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात राजारामबापू कारखाना हा सक्षम कारखाना म्हणून मानला जातो. या कारखान्याची एक शाखा असून दोन कारखाने चालविण्यास घेतले आहेत. प्रत्येक हंगामात ऊस उत्पादकाला चांगला दर देण्याची कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका नेहमीच बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र गत निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे. यावेळीही शेतकरी संघटनेने चार उमेदवार उभे करून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे.
नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व रघुनाथदादा पाटील यांचे शिष्य खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार
आहेत.
यावेळी ऊस उत्पादकाला जयंत पाटील यांनी एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. याविरोधात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आवाज उठवला नाही, याचीही खंत ऊस उत्पादकांत आहे. राजारामबापू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ऊस उत्पादकांनी जो कारखाना जास्त दर देईल, त्याच कारखान्याला ऊस घालण्याचे धोरण अवलंबले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांची ताकद तोकडी तर पडली आहेच, त्यातच विरोधकांच्या पाठीशी ऊस उत्पादकही नसल्याचे चित्र आहे.
जयंत पाटील नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत होऊ लागली आहे. येणाऱ्या सहकारी संस्थांच्या सर्वच निवडणुका ते सहजरित्या पार पाडतील. त्यामुळे या कारखाना निवडणुकीतील रघुनाथदादांचे आव्हान अत्यंत तोकडे ठरणार आहे.
‘स्वाभिमानी’ तर रिंंगणातच नाही...
राजारामबापू साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका नेहमी बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र मागील निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.