जयंतरावांच्या एन्ट्रीने पदाधिकारी नरमले

By Admin | Updated: May 25, 2014 00:48 IST2014-05-25T00:42:04+5:302014-05-25T00:48:29+5:30

इस्लामपुरातील चित्र : राजू शेट्टींच्या मताधिक्याचा परिणाम

Jayantrao's entry officer Mamale | जयंतरावांच्या एन्ट्रीने पदाधिकारी नरमले

जयंतरावांच्या एन्ट्रीने पदाधिकारी नरमले

 अशोक पाटील, इस्लामपूर : लोकसभेच्या निकालानंतर आठवड्याने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी येथील मंत्री कॉलनीतील विवाह समारंभात अचानक हजेरी लावली. यावेळी तेथे उपस्थित असणार्‍या राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांचे चेहरे नरमल्याचे दिसले. लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर शहरासह मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांना मिळालेल्या मताधिक्याचा हा परिणाम असल्याचे जाणवले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांची लढत असताना जयंत पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना कामाला लावले, परंतु ऊस उत्पादकांसह शहरी भागातून मतदारांनी शेट्टी यांना मताधिक्य दिले. लोकसभेच्या निकालानंतर जयंतरावांनी पहिल्यांदाच इस्लामपुरातील एका विवाह समारंभाला अचानक हजेरी लावली. आतापर्यंत जयंतरावांची भेट घेण्यास टाळाटाळ करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, इस्लामपूरच्या नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदेही तेथे उपस्थित होते. परंतु जयंतरावांना अचानक समोर पाहून चेहरे लपवणार्‍या या पदाधिकार्‍यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते! निकालानंतर जयंतरावांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. निकालाचे विश्लेषण केल्यानंतर ते मुंबईला गेले होते. त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे शनिवारी एका विवाह समारंभास ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीबाबत कोणालाही कल्पना नव्हती. मुंबई येथे विधानसभेच्या अनुषंगाने घडामोडी होत असताना जयंतरावांनी मात्र इस्लामपुरात हजेरी लावली. लोकसभेच्या पराभवानंतर जनसामान्यात मिसळा, असा संदेश शरद पवारांनीच दिल्यामुळे त्यांनी आज दिवसभरात मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. शिवाय जनसामान्यांची विचारपूसही केली. त्यांच्यातील या बदलामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केल्याची चर्चा विवाह समारंभात रंगली होती. तथापि जयंतरावांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांशी दिलखुलास चर्चा केली नाही, यावरून त्यांची नाराजी कायम असल्याचे स्पष्ट दिसत होते.

Web Title: Jayantrao's entry officer Mamale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.