‘महांकाली’च्या फडात जयंतरावांचा कोयता
By Admin | Updated: November 27, 2014 00:21 IST2014-11-26T22:55:17+5:302014-11-27T00:21:42+5:30
अंतर्गत राजकारणाची धार : कवठेमहांकाळ तालुक्यातील उसाचा ओघ जत कारखान्याकडेच अधिक

‘महांकाली’च्या फडात जयंतरावांचा कोयता
अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -येथील महांकाली कारखान्याच्या फडात माजी मंत्री जयंत पाटील यांचा कोयता जोरात चालला असून, तालुक्यातील उसाचा ओघ ‘राजारामबापू’ने चालविण्यास घेतलेल्या जतच्या कारखान्याला सुरू झाला आहे. जयंतरावांच्या या कोयत्याला अंतर्गत राजकारणाची धार लावल्याचे बोलले जात आहे. यामुळे विजय सगरेंच्या ‘महांकाली’च्या गाळप उद्दिष्टाला ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत.
विजय सगरे यांनी गेली २८ वर्षे दुष्काळाशी सामना करत कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचे धुराडे सुरू ठेवले आहे. मागील दोन वर्षात तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी ‘महांकाली’च्या शिवारात आणले आणि तालुक्यात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. या हंगामात तब्बल १०,७५० एकरावर उसाचे क्षेत्र उपलब्ध आहे. महांकाली कारखाना एरव्ही उसासाठी परजिल्ह्यासह परराज्यात भटकंती करत होता, पण आता कार्यक्षेत्रातच उसाचे क्षेत्र मुबलक झाले आहे. यावर्षी ‘महांकाली’ला कार्यक्षेत्रातच साडेतीन लाख टन ऊस गाळपासाठी मिळणार आहे.
मात्र ‘महांकाली’च्या सुगीच्या दिवसांना शेजारच्या जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याच्या युनिटने हादरा दिला आहे. ‘राजारामबापू’ने जतचा डफळे कारखाना चालवण्यास घेतला असून, या युनिटसाठी ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील उसावर कोयता चालविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गाळप उद्दिष्टासाठीही आता ‘महांकाली’स मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.
जतच्या कारखान्याने ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रात ५२ ऊसतोड टोळ्या उतरवल्या आहेत, तर वाहतुकीसाठी ५२ ट्रॅक्टरही कवठेमहांकाळ-जत मार्गावर जोरात धावू लागले आहेत. जत कारखान्याकडे ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील दीड हजार एकरावर उसाची नोंद झाली आहे. क्रमपाळी पूर्ण झाल्यानंतर पुरवणीमध्ये उसाची नोंद करून शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास जत कारखाना प्राधान्य देणार असल्याचे खात्रीशीर व विश्वसनीय वृत्त आहे.
‘महांकाली’च्या माध्यमातूनही कार्यक्षेत्रातील ऊस उचलण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचे कारखान्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात कारखान्याच्या नियोजित कार्यक्रमानुसारच संथगतीने ऊस नेण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे.
दुष्काळी टापूतील महत्त्वाचे उद्योग केंद्र म्हणून परिचित असलेल्या ‘महांकाली’ला जयंतरावांनी दुष्काळी टापूतच जतच्या खडकावरून ‘राजारामबापू’च्या माध्यमातून आव्हान दिले आहे. या उसाच्या स्पर्धेने ‘महांकाली’समोर नवे संकट उभे राहिले आहे.
जयंतरावांच्या या कोयत्याला अंतर्गत राजकारणाची तीव्र धार असल्याची चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार ठिकाणी भाजपचे कमळ फुलले, परंतु ते कमळ फुलण्यामागे जयंतरावांचे खतपाणी होते, असे सांगितले जाते. तथापि ‘महांकाली’च्या मैदानात कमळ फुलले नाही, याची सल कदाचित जयंतरावांच्या मनात बोचत असल्यानेच त्यांनी ‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रात कोयत्याला राजकीय धार लावल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काही स्थानिक कार्यकर्तेही जयंतरावांच्या कोयत्याला पाणी लावून धार अधिक तीव्र करत आहेत. तालुक्यातील करोली (टी), हिंगणगाव, कुकटोळी, कोंगनोळी, रामपूरवाडी, सराटी, अग्रण धुळगाव, रांजणी, म्हैसाळ या गावांतून जयंतरावांच्या कोयत्याने सपाटा लावला आहे. सगरे आणि पर्यायाने आर. आर. पाटील यांच्यावर या माध्यमातून कुरघोड्या सुरू आहेत. काहीजण रांजणी, करोली (टी), धुळगाव, कोंगनोळी परिसरातून जत कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना फूस लावत आहेत.
महांकाली व जत कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नाही, तरीही ऊसतोड मात्र जोमात सुरू आहे.
‘महांकाली’च्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना शेतकरी देऊ लागल्याने याचा परिणाम ‘महांकाली’वर होणार आहे. गेली २८ वर्षे दुष्काळाशी टक्कर देत हा कारखाना गाळप उद्दिष्ट साध्य करीत आला आहे. यंदाही इतर क्षेत्रातून, कर्नाटकातून ऊस आणावा लागल्यास तो आणून उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.
- मनोज सगरे, प्रभारी कार्यकारी संचालक, महांकाली कारखाना
या हंगामात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या जत युनिटचे चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, कवठेमहांकाळ तालुक्यातील दीड हजार एकरातील उसाची नोंद जत कारखान्याकडे झाली आहे. पुरवणीतही ऊस नोंद करण्यात येईल व शेतकऱ्यांचा ऊस नेण्यात येईल.
- प्रशांत पाटील, शेती अधिकारी,
जत कारखाना
कळीचा मुद्दा
महांकाली कारखान्याची उभारणी विजय सगरे यांचे वडील नानासाहेब सगरे यांनी केली. नानासाहेब सगरे हे राजारामबापूंचे अनुयायी मानले जातात. राजारामबापूंनी नानासाहेबांना मोठी मदत केल्यानेच कारखान्याच्या परिसराला ‘राजारामबापूनगर’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र आता विजय सगरे यांनी जयंतरावांचा हात सोडून आर. आर. पाटील यांचा हात धरला आहे. त्यामुळेच राजारामबापूंचे पुत्र असलेल्या जयंत पाटील यांनी या कारखाना कार्यक्षेत्रात कोयता जोरात चालवला असल्याचे सांगितले जाते.