इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक व शिक्षण संस्थाचालक निशिकांत भोसले-पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादीला रामराम करत विरोधी विकास आघाडीत प्रवेश केला. जयंत पाटील यांचे फोडाफोडीचे तंत्र त्यांच्यावरच उलथवत विरोधकांनी जोरदार झटका दिला. निशिकांत पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.इस्लामपुरात सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप, शिवसेना, मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. त्यात काँग्रेसचेही काही नेते आहेत. आघाडीतील खा. राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, रणधीर नाईक या नेत्यांनी बुधवारी भाजपचे विक्रम पाटील, काँग्रेसचे वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार यांना त्यासाठी राजी केले. राष्ट्रवादीमधून पहिल्या टप्प्यातील मुलाखती संपल्यानंतर आमदार पाटील व सुकाणू समितीतील सदस्यांनी बहुतांश उमेदवार निश्चित केले. यामध्ये पीरअली पुणेकर व शहाजी पाटील यांना डावलल्याचे समजल्यानंतर ते नाराज झाले. मुलाखती घेतल्यानंतर इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी राजारामबापू इन्स्टिट्यूटवर बोलाविले.दुसरीकडे विकास आघाडीतील सर्व पक्षांची बैठक झाली. राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपदाच्या मुलाखतीस गेलेल्या निशिकांत पाटील यांनाही या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे नाराज झालेल्या विक्रम पाटील आणि वैभव पवार यांनी बैठकीस येण्यास नकार दर्शवला. मात्र, राहुल महाडिक व रणधीर नाईक यांनी दोघांशी चर्चा करून त्यांचे मतपरिवर्तन केले आणि एकदाची विरोधकांची मोट बांधली गेली. त्यानंतर निशिकांत पाटील यांनी विकास आघाडीत प्रवेश केला. (प्रतिनिधी)कोण आहेत निशिकांतदादानिशिकांत भोसले-पाटील हे शहरातील प्रतिष्ठित मानाजी पाटील परिवारातील आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकदादा पाटील यांचे पुतणे, तर विकास आघाडीचे अध्यक्ष, भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. महाराष्ट्र वीज कामगार काँग्रेसचे (इंटक) ते कार्याध्यक्ष आहेत. २० वर्षांपूर्वी त्यांनी आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले. राजारामबापू रुग्णालयाच्या उभारणीनंतर त्यांनी प्रकाश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे विणले आहे.तिसऱ्या आघाडीकडून विश्वास सायनाकर : पालिका निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या ‘बहुजन मानवाधिकार’ या तिसऱ्या आघाडीकडून माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
इस्लामपुरात जयंतरावांना झटका
By admin | Updated: October 27, 2016 00:14 IST