जयंतराव म्हणतात, कोअर कमिटी अनधिकृत
By Admin | Updated: May 19, 2017 00:25 IST2017-05-19T00:25:16+5:302017-05-19T00:25:16+5:30
जयंतराव म्हणतात, कोअर कमिटी अनधिकृत

जयंतराव म्हणतात, कोअर कमिटी अनधिकृत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मला कोणतीही कल्पना न देता कोअर कमिटी स्थापन झाली आहे. त्यामुळे ती अधिकृत नसल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी दूरध्वनीवरून पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यातील गटबाजी उफाळली आहे. यावर जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोअर कमिटी माझ्या मान्यतेशिवाय झाली आहे. ती पक्षाने नियुक्त केलेली नाही. त्यामुळे त्यास अधिकृत म्हणता येणार नाही. कमलाकर पाटील आणि संजय बजाज यांच्यात कोणतेही वाद नाहीत. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही. काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असू शकतात. हा माझ्यादृष्टीने गंभीर विषय नाही.
एखादा प्लॅटफॉर्म तयार करून कार्यकर्ते सक्रिय होऊ पाहत आहेत, ही जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांच्या सक्रियतेला माझा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी एकसंध आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्ष सज्ज आहे. पक्षाला वातावरणही चांगले आहे. लवकरच राष्ट्रवादी पक्षातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी याबाबत आपण संवाद साधणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
बॅँकेत पदाधिकारी बदल नाही!
जिल्हा बँकेत पदाधिकारी बदलाचा कोणताही विषय चर्चेत नाही. बदलाचे कोणते कारणही नसल्याने अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुखच काम पाहतील, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.