महापालिकेविरोधात जयंतराव रस्त्यावर
By Admin | Updated: September 16, 2015 00:16 IST2015-09-16T00:12:15+5:302015-09-16T00:16:05+5:30
सांगलीत भर पावसात मोर्चा : भ्रष्टाचार, गोंधळाने तिन्ही शहरांची सत्ताधाऱ्यांनी वाट लावल्याचा आरोप

महापालिकेविरोधात जयंतराव रस्त्यावर
सांगली : महापालिकेतील गोंधळ, भ्रष्टाचारामुळे शहराची वाट लागली असून, नागरिकांना किमान सुविधा पुरविण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. या शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी मोर्चाद्वारे दिला.
पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोर्चा काढला. भर पावसात निघालेल्या या मोर्चाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पाणी खासगीकरण, गुंठेवारीची दैना, रस्ते, आरोग्य, कचरा उठाव या समस्यांविरोधात राष्ट्रवादीने मंगळवारी रणशिंग फुंकले. या मोर्चाला राष्ट्रवादी कार्यालयापासून सुरूवात झाली. राममंदिर, स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे मोर्चा महापालिकेवर आला.
आंदोलकांसमोर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. त्यात सुधारणा करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी खासगीकरणाचा घाट घातला आहे. ठेकेदाराला बिले गोळा करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. तो धाक दाखवून पैसे वसूल करणार आहे. गेल्या काही महिन्यात सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधात आपण रस्त्यावर उतरलो आहे. महाआघाडीच्या काळात ७० व ५६ एमएलडी जलशुद्धीकरणाचे काम हाती घेतले होते. सत्ता सोडली तेव्हा हे काम ८० टक्के पूर्ण झाले होते. गेली अडीच वर्षे २० टक्केही काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना शेरीनाल्याचे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाणी शुद्ध करण्यात महापालिका अपयशी ठरली. महाआघाडीच्या काळात कोट्यवधीच्या योजना सुरू केल्या, पण त्या पूर्ण करता आलेल्या नाहीत.
सांगली, मिरजेसाठी आम्ही ड्रेनेज योजना मंजूर केली. महाआघाडीच्या काळात काम सुरू झाले. पण आता मिरजेत १६ किलोमीटरचे काम बेकायदा झाले आहे. आराखडाबाह्य कामे करण्यात आली. ही महापालिका नागरिकांच्या हितासाठी नव्हे, तर ठेकेदारांसाठी काम करीत आहे. गुंठेवारीतील जनतेचे हाल होत आहेत. ज्यांच्या हाती सत्ता दिली, त्यांनी महापालिका व्यवस्थित चालविली नाही. अर्थकारण सांभाळले नाही. त्यामुळे गुंठेवारीत रस्ते, गटारी, ड्रेनेजचे काम झालेले नाही.
महापालिकेत होणारा भ्रष्टाचार व गोंधळामुळे वाट लागली आहे. राजकीय हव्यासापोटी नव्हे, तर कारभार सुधारण्यासाठी सत्ताधारी, अधिकाऱ्यांना जाग यावी, म्हणून आम्ही मोर्चा काढला आहे. शहरातील जनतेवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे, वेळीच सावध व्हावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करेल, असा इशारा दिला.
माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले की, महाआघाडीच्या काळात शहराच्या विकासासाठी सातशे कोटीचा निधी आणला होता. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी विकासाला खो घातला आहे. त्यांच्या कारभाराबद्दल जनतेत तीव्र असंतोष आहे.
विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी, पाणी खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा दिला. तसेच विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी, महापालिका चालविता येत नसेल तर काँग्रेसने राजीनामे द्यावेत, आम्ही महापालिका चालवून दाखवू, असे आव्हान दिले.
यावेळी माजी नगरसेवक हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, राहुल पवार यांचीही भाषणे झाली. मोर्च्यात नगरसेवक विष्णू माने, युवराज गायकवाड, राजू गवळी, संगीता हारगे, प्रसाद मदभावीकर, सुनील कलकुटगी, प्रियंका बंडगर, शहराध्यक्ष सागर घोडके, मिरज शहराध्यक्ष साजीद पठाण, कुपवाडचे प्रकाश व्हनकडे, वसुधा कुंभार, मनोज भिसे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्रीही सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी!
महापालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली. मूळ आराखड्याव्यतिरिक्त १६ किलोमीटरची पाईपलाईन टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत, चौकशीची मागणी केली. पण अजूनपर्यंत काहीच हालचाल नाही. मुख्यमंत्री भाजपचे असूनही ते पालिकेतील सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. या घोटाळ्याची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.
आयुक्तांकडून आश्वासन
आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्त कारचे यांनी, पाणी पुरवठा खासगीकरणाचा ठराव महासभेने केला असला तरी, त्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. जलशुद्धीकरण केंद्रासाठी १४ व्या वित्त आयोगातील निधीची तरतूद करून, महिन्याभरात काम पूर्ण करण्याची हमीही त्यांनी दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)