जयंतराव म्हणजे मृगजळ दाखविणारे जादूगर
By Admin | Updated: September 16, 2015 00:16 IST2015-09-16T00:10:52+5:302015-09-16T00:16:21+5:30
विवेक कांबळे : राष्ट्रवादीचा मोर्चा हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याची टीका

जयंतराव म्हणजे मृगजळ दाखविणारे जादूगर
सांगली : पाच वर्षांपूर्वी महाआघाडीच्या रूपाने आ. जयंत पाटील यांनी महापालिकेत प्रवेश केला होता. या काळात त्यांनी कोणती विकासकामे केली, याचा प्रथम उलगडा करावा. ते मृगजळ दाखविणारे जादूगर आहेत, अशी टीका महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. पाणी खासगीकरणावरून राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात मंगळवारी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोर्चा काढला. याबाबत महापौर कांबळे यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले की, विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन देत महाआघाडीने दहा कोटींचा चुराडा केला होता. तेच आता रस्त्यावर उतरून खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा देत आहेत. वस्तुत: आम्ही पाण्याचे खासगीकरण केलेले नाही.
जयंतराव पंधरा वर्षे सत्तेत होते. त्यातील अकरा वर्षे ते अर्थमंत्री होते. त्यांनी जनतेसाठी कोणता प्रकल्प राबविला, याचे एक तरी उदाहरण द्यावे. सांगलीची जनता त्यांना चांगलीच ओळखून आहे. म्हणून त्यांचे पार्सल इस्लामपूरला परत पाठविले होते. मंत्रालयातील बंद खोलीत ठेकेदारांना कामे वाटण्याचा उद्योग त्यांनी केला. त्यामुळेच तत्कालीन महापौर इद्रिस नायकवडी यांना त्यांच्याविरोधात बंड करावे लागले. त्यांची धोरणे चुकीची होती, म्हणूनच आम्हीही बाहेर पडलो. मंत्री असताना ते कधी रस्त्यावर उतरले होते का? आताचे सांगलीकरांसाठीचे त्यांचे प्रेम पुतनामावशीचे आहे. (प्रतिनिधी)