जयंतरावांनी टाळली मदनभाऊंवर टीका

By Admin | Updated: September 16, 2015 00:15 IST2015-09-16T00:15:30+5:302015-09-16T00:15:57+5:30

काँग्रेसवर मात्र आरोप : आश्वासन पूर्तीऐवजी नको ते उपद्व्याप!

Jayantrao criticizes Tulali Madanbau | जयंतरावांनी टाळली मदनभाऊंवर टीका

जयंतरावांनी टाळली मदनभाऊंवर टीका

सांगली : गेल्या दोन ते अडीच वर्षांत महापालिका विकलांग झाली आहे. नागरिकांना सुविधा देण्यात सत्ताधारी काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे, अशी टीकेची झोड उठविताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्या मदन पाटील यांच्यावर मात्र थेट टीका करण्याचे टाळले. महापालिका निवडणूक प्रचारासाठी आलेल्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांची ही जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत. एखाद्याचे नाव घेतले, तर दुसरा नाराज होईल, असे म्हणत थेट टीका करण्यास त्यांनी बगल दिली.
जिल्हा बँक व बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील व मदन पाटील एकत्र आले होते. मात्र, हे दोन्ही नेते महापालिकेत एकमेकांचे विरोधक म्हणून काम करीत आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात मंगळवारी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोर्चा काढला. मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना जयंतरावांनी पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठविली, पण मदनभाऊंवर टीका करण्यात मात्र त्यांनी हात आखडता घेतला.
पालिकेतील गोंधळ, भ्रष्टाचाराला मदन पाटील यांचे नेतृत्व जबाबदार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी जयंतरावांना विचारला, पण त्यांनी मदनभाऊंचे थेट नाव न घेता पक्ष म्हणून काँग्रेसचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, महापालिकेत काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यामुळे एकाचे नाव घेतले, तर दुसरा नाराज होईल. मदनभाऊ, पतंगराव कदम यांचे नाव घेण्यापेक्षा काँग्रेस पक्षच महापालिकेचा कारभार चालविण्यात अपयशी ठरला आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी येथील जनतेला आश्वासने दिली होती. त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी.
महापालिकेच्या कारभाराबद्दल ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात आर्थिक गोंधळामुळे महापालिका विकलांग झाली आहे. जकात, एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेने नवे पर्याय शोधण्याची गरज होती. महाआघाडीच्या काळात तिजोरीत पैसा नाही, म्हणून आम्ही रडत बसलो नाही. विकासासाठी निधीची उभारणी केली. सत्ता सोडतानाही पालिकेच्या तिजोरीत चाळीस कोटी शिल्लक होते. सत्ताधारी काँग्रेस जनतेला दिलासा देऊ शकलेली नाही. गुंठेवारी भागात सुविधांची वानवा आहे. पाणी खासगीकरणातून नागरिकांवर मोठा भुर्दंड बसणार आहे. पालिकेत सत्ताधाऱ्यांकडून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी नको ते उपद्व्याप सुरू आहेत. महासभेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. बीओटीवर जागा विकसित करण्याचा घाट घातला आहे. बीओटीमुळे गतवेळी त्यांची सत्ता गेली, तरीही त्यांना शहाणपण आलेले नाही. पालिकेतील दोष दाखविण्याचे काम राष्ट्रवादी यापुढेही करणार आहे. त्यातून कारभारात सुधारणा न झाल्यास संघर्ष अटळ आहे. (प्रतिनिधी)
... तर पुढील निवडणुकीत उमेदवारी नाही
महापालिकेतील अनेक ठरावांवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या सह्या असल्याचे निदर्शनास आणून देताच जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विकासकामांसाठी सह्या केल्या असतील, तर त्या समजू शकतो. पण चुकीच्या कामासाठी सह्या केल्या असतील, तर त्यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी देणार नाही. अशा सह्या करणाऱ्या नगरसेवकांचे विरोधी पक्षनेते सूर्यवंशी यांनी संशोधन करावे.
तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या गोटात गेल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तासगाव नगरपालिकेत काय चालले आहे, याची मला माहिती नव्हती. तेथील नगरसेवकांनाही मी ओळखत नाही. आमदार सुमनताई पाटील व तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई हेच नगरपालिकेचे काम पाहत आहेत. सत्ता गेल्यावर थोडीफार पडझड होत असते म्हणून तासगावच्या जनतेच्या मनात बदल झाला, असे नाही.

Web Title: Jayantrao criticizes Tulali Madanbau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.