जयंतराव विरोधकांचा ‘मातोश्री’वर ठिय्या
By Admin | Updated: September 9, 2014 23:52 IST2014-09-09T23:03:25+5:302014-09-09T23:52:45+5:30
इस्लामपूर मतदारसंघ : महायुतीच्या उमेदवार निवडीचा तिढा अद्यापही कायम

जयंतराव विरोधकांचा ‘मातोश्री’वर ठिय्या
अशोक पाटील -इस्लामपूर --ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीतील शिवसेनेला उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव राहुल महाडिक व नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले भीमराव माने यांनी ‘मातोश्री’वर ठिय्या मारल्याचे समजते. मात्र महायुतीच्या उमेदवार निवडीचा तिढा अद्यापही कायम आहे.
शिराळा मतदारसंघातील राजकारण साटेलोटे केल्याशिवाय पुढे सरकत नाही. येथे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना नानासाहेब महाडिक यांच्या मदतीची गरज आहे, तर विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना काँग्रेसचे सत्यजित देशमुख आणि जयंत पाटील समर्थकांची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. सध्या राष्ट्रवादीविरोधात महायुतीतून शिवाजीराव नाईक यांचे नाव आघाडीवर आहे, तर त्यांना मदत करण्यासाठी सरसावलेले नानासाहेब महाडिक यांना इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे महाडिक समर्थकांनी ‘मातोश्री’वर तळ ठोकला आहे.
इस्लामपूरचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी वाढदिनी मुंबईत जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी वाढदिवस भेट म्हणून तुम्ही कामाला लागा, असा आदेश मिळाल्याचे पवार सांगत आहेत. त्यातच कवठेपिरानचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांनीही आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचे सांगून हवा केली आहे. त्यामुळे गेला महिनाभर गावपातळीवर संपर्कात असलेले नानासाहेब महाडिक यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही, तर दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभा करून बंडखोरी करण्याच्या विचारात महाडिक गट आहे.
जयंत पाटील यांना पराभूत करण्याचा विडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी उचलला असला तरी, त्यांच्या पक्षाला अपेक्षित जागा मिळत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात उमेदवार कोण, यावर शेट्टी आणि सदाभाऊ खोत बोलण्यास इच्छुक नाहीत. कोणत्याही घटकपक्षाला उमेदवारी गेली तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना जयंत पाटील यांच्या विरोधासाठी एकदिलाने काम करणार आहे. तरीही महायुतीतील नेते मात्र बंडखोरीची भाषा करीत आहेत.