जयंतरावांची जिल्हा परिषदेसाठी नवी जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:06+5:302021-09-12T04:31:06+5:30
सांगली : काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जुळवाजुळव करीत आहेत. भाजपचे ...

जयंतरावांची जिल्हा परिषदेसाठी नवी जुळवाजुळव
सांगली : काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जुळवाजुळव करीत आहेत. भाजपचे नेते अंतर्गत संघर्षात व्यस्त आहेत, तर काँग्रेसमध्येही दादा-कदम गटाच्या मनोमिलनवर पक्षाचे जिल्हा परिषदेतील भवितव्य अवलंबून आहे.
जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत. या निवडणुकीसाठी जयंत पाटील रणनीती आखत आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्यांना परत आणण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, आटपाडीचे भारत पाटील, जत तालुक्यात बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, मन्सूर खतीब, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, कडेगावमधील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख, माजी नगराध्यक्ष नीता देसाई यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पक्षाची मजबूत बांधणी जयंत पाटील यांनी सुरू केली आहे. पक्षात घेतलेल्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गटात वजन आहे. आणखी काही नेतेही राष्ट्रवादीत येणार आहेत. पण, त्यांचा अजून पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाही.
आमदार विक्रम सावंत यांच्या माध्यमातून काँग्रेसला तरुण जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते अपेक्षेने पहात आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेस मजबूत करून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्याची घोषणा केली आहे, पण, त्यादृष्टीने हालचाली दिसत नाहीत. दादा-कदम गटाने एकसंघपणे काम केले तर जिल्हा परिषदेत काँग्रेस वरचढ ठरू शकते. परंतु, दादा-कदम गटाचे कृतीतून मनोमिलन होण्याची गरज आहे.
भाजपमध्ये सध्या गटातटाचे राजकारण जोमात आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. या दोन नेत्यांच्या संघर्षात भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांची मुस्कटदाबी झाली आहे. नेत्यांच्या संघर्षात जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता टिकणार का, अशी चर्चा आहे. देशमुखांपुढे कडेगाव, पलूस तालुक्यातील संख्याबळ टिकवणे मोठे आव्हान आहे. तेवढेच आव्हान तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात संजयकाका पाटील, मिरज तालुक्यात आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जतमध्ये माजी आ. विलासराव जगताप, आटपाडीत माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. गोपीचंद पडळकर यांच्यापुढेही आहे.
चौकट
शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची तयारी
आमदार अनिल बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दिग्गज शिवसेनेत आहेत. या दोघांची त्यांच्या मतदारसंघात ताकद आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी असली तरी ती जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांत होण्याची शक्यता कमी आहे. सदाशिवराव पाटील राष्ट्रवादीत असल्यामुळे खानापूर-आटपाडी तालुक्यात बाबर राष्ट्रवादीबरोबर येणार नाहीत. यामुळे शिवसेनेची ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका असणार आहे. कदाचित घोरपडे राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकतील.