इस्लामपुरात १०८ वर्षांच्या जिद्दी आजीला जयंतरावांचा सलाम..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:22+5:302021-06-09T04:35:22+5:30
इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या कहरामुळे भल्याभल्यांना घाम फुटला. मात्र, शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरिना अब्दुल शेख यांनी कोरोनाला ...

इस्लामपुरात १०८ वर्षांच्या जिद्दी आजीला जयंतरावांचा सलाम..!
इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या कहरामुळे भल्याभल्यांना घाम फुटला. मात्र, शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरिना अब्दुल शेख यांनी कोरोनाला आपल्या जवळपास तर फिरकू दिलेच नाही उलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे. त्यांच्या या जिद्दीला सलाम करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील जनतेबरोबर असलेला ऋणानुबंध सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरिना आजीने ‘लवकर आलास...’ अशी हाक देत विचारपूस केली. त्याला प्रतिसाद देत जयंत पाटील यांनी जरिना आजीचा हात हातात घेत स्नेहपूर्ण संवाद साधला.
ते म्हणाले, जरिना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घेऊन कोरोनाला पराभूत करावे.
यावेळी डॉ. नरसिंह देशमुख, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण कांबळे, खंडेराव जाधव, शहाजी पाटील, रोझा किणीकर, ॲड. मनीषा रोटे, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.
फोटो : 07062021sangli01
ओळ : इस्लामपूर येथे १०८ वर्षांच्या जरिना शेख यांचा सत्कार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोझा किणीकर, अरुण कांबळे उपस्थित होते.