पुन्हा कदम-दादा गटांना दाबण्याचे जयंतरावांचे इरादे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:48+5:302021-04-04T04:26:48+5:30

श्रीनिवास नागे राज्यात महाआघाडीचे सरकार स्थिर झाल्यापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रबळ राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा ...

Jayantarao intends to suppress Kadam-Dada groups again | पुन्हा कदम-दादा गटांना दाबण्याचे जयंतरावांचे इरादे

पुन्हा कदम-दादा गटांना दाबण्याचे जयंतरावांचे इरादे

श्रीनिवास नागे

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थिर झाल्यापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रबळ राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. सत्तेतील बलदंड ताकदीवर काँग्रेसमधील वसंतदादा आणि कदम गटांना दाबण्याचे त्यांचे इरादे लपून राहिलेले नाहीत. किंबहुना गेल्या काही महिन्यांपासून त्यात ते कमालीचे यशस्वीही होत आहेत. अर्थात नेहमीची गटबाजी, खमक्या नेतृत्वाचा अभाव, अनुभवाची वानवा, जिल्हाभरात प्रभावाची कमतरता याद्वारे काँग्रेसनेच जयंतरावांना मखमली पायघड्या घातल्या आहेत.

जिल्हाभरात स्वत:चा सशक्त गट निर्माण करण्याचे जयंतरावांचे मनसुबे काही वर्षांपूर्वी पूर्णत्वास गेलेही होते. त्यावेळी काँग्रेसमधील पतंगराव कदम, मदन पाटील आणि राष्ट्रवादीतील आर. आर. पाटील या मातब्बरांना शह देण्यासाठी त्यांनी खेळ्या केल्या होत्या. पतंगराव आणि आर. आर. आबांनी सुरुवातीपासून, तर शेवटी मदनभाऊंनीही मुत्सद्दीपणा दाखवत त्यांच्याशी हातमिळवणी केली होती. या तीन दिग्गजांच्या निधनानंतर मात्र जयंतरावांचा वारू सुसाट सुटला; पण त्यादरम्यान राज्यातील सत्ता गेल्यामुळे गटविस्ताराला मर्यादा आली. शिलेदार फुटले. पक्ष सोडून गेले. राजकारणातील या चढउतारांची एव्हाना सवय झालेल्या जयंतरावांनी सत्तेपासून दूर होण्याची कडू फळे पाच वर्षे चाखली. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, यावर त्यांचा गाढा विश्वास... आणि राज्यातील सत्तेत ते परतले. वजनदार मंत्री बनले. मग जिल्ह्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी पुन्हा उचल खाल्ली नसती तरच नवल!

काँग्रेसमध्ये कदम आणि वसंतदादा गटातील राजकीय हाडवैर सर्वज्ञात आहे. हे दोन्ही गट एकमेकांशी लढण्यातच शक्ती खर्ची करतात. गेल्या काही वर्षांपासून सततच्या पराभवांनी वसंतदादा गट कमजोर झाला आहे. मदनभाऊंचे निधन झाले आहे, तर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत, तर वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्याकडे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाशिवाय कोणतेच पद नाही. पतंगरावांचे मोठे बंधू तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम वयोमानामुळे जिल्हाभरात फिरू शकत नाहीत. परिणामी काँग्रेसची आणि कदम गटाची धुरा कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या खांद्यावर आहे. राज्य मंत्रिमंडळातील जबाबदारी, भारती विद्यापीठाचा अवाढव्य पसारा सांभाळताना त्यांना जिल्ह्यातील पक्षविस्ताराकडे पूर्ण क्षमतेने लक्ष देता येत नाही. नेमका याचाच फायदा जयंतराव उठवत आहेत.

चौकट

विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यातील दरी

विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघेही तरुण नेते. काँग्रेसचे आश्वासक चेहरे. राजकारणात भरारी घेण्याची दोघांकडेही क्षमता, आस आणि हुशारी; पण यातूनच दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. दोघांनी याचा इन्कार केला असला तरी ते सत्य कार्यकर्त्यांनी कधीच स्वीकारले आहे. वरिष्ठ नेत्यांनीही दोन्ही गटांतील दरी सांधायचा प्रयत्न केला; पण कुरबुरी संपलेल्या नाहीत. विश्वजित यांना राज्यासह जिल्ह्यातही पक्षावर पकड ठेवायची आहे, तर विशाल यांना पुन्हा दादा गट मजबूत करत स्वत:चे नेतृत्व सिद्ध करायचे आहे. गटबाजीमुळे त्यांच्याच नेतृत्वाला खीळ बसल्याने अलीकडे मात्र दोघेही पक्षाच्या सर्व कार्यक्रमांत एकत्र दिसतात. महापालिकेत राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची सत्ता आल्यामुळे हा गोडवा वाढला आहे....

चौकट

सतर्क आणि सावध झाले की काय?

जयंतरावांनी दादा-कदम गटांना वारंवार दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे दोन्ही गट अलीकडे एकत्र आल्याचे बोलले जाते. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथविण्यात जयंतराव यशस्वी झाले. संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी असतानाही राष्ट्रवादीचा महापौर झाला. जिल्ह्यात आणि विधानसभा मतदारसंघात निधी आणण्यापासून महत्त्वाचे निर्णय घेण्यापर्यंत जयंतरावांचा वचक दिसतो. आढावा बैठकीवर त्यांचीच हुकूमत असते. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात ओढण्यासाठी तेच पुढे असतात... आणि दादा-कदम गटांत कलागती लावून देण्यामागेही त्यांचाच हात असतो... हे कळल्यामुळे दोन्ही गट सतर्क आणि सावध झाले की काय? (पूर्वार्ध)

Web Title: Jayantarao intends to suppress Kadam-Dada groups again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.