सांगली ते पेठ रस्त्याबाबत जयंतरावांनी व्यक्त केली दिलगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:44+5:302021-09-06T04:29:44+5:30
सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत ...

सांगली ते पेठ रस्त्याबाबत जयंतरावांनी व्यक्त केली दिलगिरी
सांगली : पेठ ते सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेत पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील हा रस्ता असला तरी अधिकाऱ्यांना रस्तेदुरुस्तीसाठी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.
जयंत पाटील यांनी रविवारी दुपारी ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पेठ ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे म्हणजेच केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे भरून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता मुरूमसुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने डांबरीकरण करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
जयंत पाटील यांनी याप्रश्नी दखल घेतल्याबद्दल नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी त्यांना धन्यवाद दिले. साखळकर म्हणाले की, पालकमंत्री म्हणून त्यांनी या प्रश्नाची दखल घेतली आहे. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हे काम पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. महाराष्ट्रातील एक मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी तसेच भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पक्षीय अभिनिवेश न बाळगता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून चौपदरीकरण होईपर्यंत थांबू नये, अशी अपेक्षा आहे.
चौकट
‘लाेकमत’कडून प्रकाशझोत
सांगली ते पेठ रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळे होणारे नागरिकांचे, वाहनधारकांचे हाल व यावर मौन बाळगलेले राजकारणी यांविषयी प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
चौकट
भाजप नेते गप्पच
राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाबाबत भाजप नेत्यांनी मौन बाळगले आहे. पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत हा विषय नसतानाही त्यांनी याची दखल घेतली. भाजपला या प्रश्नाची दखल घ्यावीशी वाटत नाही का, त्यांना या रस्त्यावर होणारे जनतेचे हाल दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.