जयंत पाटील यांच्या ‘बेरजे’ची वजाबाकी?
By Admin | Updated: October 17, 2014 22:46 IST2014-10-17T21:46:54+5:302014-10-17T22:46:08+5:30
इस्लामपूर मतदारसंघ : निकालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट

जयंत पाटील यांच्या ‘बेरजे’ची वजाबाकी?
अशोक पाटील - इस्लामपूर -विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील निकालावरील अंदाजाचे कल भाजप—शिवसेनेच्या बाजूने असले तरी, इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते. परंतु ते किती मतांची आघाडी घेतात, याचीच आकडेमोड मतदारसंघात सुरु आहे. या त्यांच्या बेरजेच्या राजकारणाला कितपत यश येणार, हे राज्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील आणि विलासराव शिंदे अशी लढत यापूर्वी चांगलीच गाजली होती. यामध्ये काँग्रेसचे विलासराव शिंदे विजयी झाले. परंतु शरद पवार यांनी सर्वच पक्षांना एकत्रित करुन पुलोद सरकार स्थापन केले. निवडणुकीत पराभूत झालेले राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. याउलट यावेळच्या निवडणुकीची परिस्थिती झाली आहे. जयंत पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असले तरी, त्यांना सत्तेत स्थान मिळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.
या मतदारसंघात खासदार राजू शेट्टी, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी एकत्र येऊन जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा डाव मांडला होता. तो हाणून पाडण्यात जयंत पाटील यशस्वी झाले. यामुळे त्यांना निवडणूक सोपी तर झाली. राज्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रहण लागल्याने, त्यांना सत्तापद मिळ्ण्याची संधी धूसर होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद असला तरी, सत्तेत संधी मिळणार नसल्याचे दु:खही त्यांच्या मनात सलत आहे.
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता, जयंत पाटील यांचे काही समर्थक भाजप-शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सत्तेसाठी शिवसेनेशी हातमिळणी करतील, असाही अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. असे झाल्यास जयंत पाटील यांना मंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांतून आहे.
एकंदरीत जयंत पाटील यांच्या विजयाने राष्ट्रवादीच्या खात्यात एका जागेची भर पडणार असली तरी, सत्तेत स्थान मिळाल्याशिवाय या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा होणार नाही, हे मात्र निश्चित.
दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच..!
जयंत पाटील यांच्याविरोधात दोन माजी जि. प. सदस्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व खासदार राजू शेट्टी यांनी या दोघांमध्ये एकमत घडवून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत.
शेवटी अभिजित व जितेंद्र पाटील यांनी पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून किमान दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न केला. यात कोण यशस्वी होणार, हे १९ तारखेला समजणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये मात्र आमचाच नेता दुसऱ्या क्रमांकावर असेल, यावर पैजाही लागल्या आहेत.