जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढणार
By Admin | Updated: October 9, 2015 00:47 IST2015-10-08T23:25:18+5:302015-10-09T00:47:01+5:30
राजू शेट्टी : नेर्ले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा; ‘एफआरपी’ची रक्कम एकाच वेळी द्या

जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढणार
नेर्ले : मी शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलो आहे. शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढणार आहे. आम्ही भाडोत्री मंडळी नव्हे. जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मला निवडून दिले आहे. येणाऱ्या काळात जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढू. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांचे कारस्थान उधळून लावू, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.नेर्ले (ता. वाळवा) येथे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते.खा. राजू शेट्टी म्हणाले, जयंत पाटील, तुम्ही मंत्री होता तेव्हा बगलबच्चांना घेऊन दरोडे घातले. परंतु मी शेतकऱ्यांसाठी लढलो. दरोडे घातले नाहीत. हा तुमच्या नि माझ्यातला फरक आहे. एफआरपीपेक्षा कमी दर देणाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन तुम्ही करणार काय? की त्यासाठी तुमच्या हातात काडीपेटी आम्ही देऊ?. १६ तारखेच्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, एकरकमी एफआरपीची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करा, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. कायद्याने दिलेले संरक्षण व हक्क अबाधित ठेवण्यासाठी एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे राहतील. ते खासगी करण्याचे मनसुबे धुळीला मिळवू.
महेश पाटील यांनी स्वागत केले. हणमंतराव कुंभार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहाजी पाटील, उत्तमराव पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास देशमुख, जयकर कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.
सभेस पी. वाय. पाटील, एल. एम. पाटील, जयकर पाटील, जयसिंग माने, भीमराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)