शेट्टींच्या विकास निधीला जयंत पाटील समर्थकांचा खो
By Admin | Updated: November 28, 2015 00:15 IST2015-11-27T23:41:09+5:302015-11-28T00:15:51+5:30
राजकीय नाट्य : जुनेखेड मंदिराच्या सभामंडपाचे काम ठप्प

शेट्टींच्या विकास निधीला जयंत पाटील समर्थकांचा खो
इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथील धनगर समाजाच्या बिरोबा मंदिराच्या सभामंडपासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या खासदार निधीतून ८ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखभाल, दुरुस्तीचा ठराव न दिल्याने सभामंडपाचे काम रखडल्याचा आरोप स्वाभिमानीचे प्रवक्ते भागवत जाधव यांनी केला.सभामंडपाच्या या कामाला विरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, नवेखेड ग्रामपंचायतीवर आमदार जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्ता आहे. या सभामंडप कामाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी जि. प.चे तत्कालीन अध्यक्ष देवराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारने पूर्वीच्या आघाडी सरकारकडून मंजूर झालेली विकासकामे रद्द केली. त्यामध्ये जुनेखेड येथील कामाचाही समावेश होता. निधीअभावी सभामंडपाचे काम ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर जुनेखेड येथील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन सभामंडप कामासाठी निधी देण्याची विनंती केली होती. त्यावर खासदार शेट्टी यांनी २0 सप्टेंबर २0१५ रोजी ८ लाख ४२ हजार रुपयांच्या निधीची शिफारस मंजूर केली. मात्र जुनेखेड ग्रामपंचायतीने हेतुपुरस्सर काम सुरु करण्यासाठी देखभाल, दुरुस्तीचा ठराव दिला नाही. त्यामुळे निधी मंजूर असतानाही, ग्रामपंचायतीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सभामंडपाचे काम सुरु झालेले नाही. (वार्ताहर)
जुनेखेड येथील बिरोबा मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार जयंत पाटील यांच्या निधीतून ९ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीस मिळाला आहे. थोड्याच दिवसात या सभामंडपाचे काम सुरु करणार आहोत.
- सौ. अनिता सतीश पाटील, सरपंच, जुनेखेड.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
ँमंदिराच्या सभामंडपावरुन सध्या राजकीय वाद सुरु आहे. सभामंडपाच्या या कामाला विरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे भागवत जाधव यांनी सांगितले.