घरवापसीसाठी राष्ट्रवादीकडे येणाऱ्यांना थोडे थांबण्याचे जयंत पाटील यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:29+5:302021-09-02T04:57:29+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : भाजप युतीच्या काळात राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी झालेल्यांतील काही नेते घरवापसीसाठी राष्ट्रवादीच्या ...

घरवापसीसाठी राष्ट्रवादीकडे येणाऱ्यांना थोडे थांबण्याचे जयंत पाटील यांचे निर्देश
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : भाजप युतीच्या काळात राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी झालेल्यांतील काही नेते घरवापसीसाठी राष्ट्रवादीच्या दारात उभे आहेत. परंतु, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना थोडे थांबण्याचे निर्देश दिले आहेत. इस्लामपूर परिसरात सध्या हे चित्र दिसून येत आहे.
इस्लामपूर पालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला. विकास आघाडीला नगराध्यक्षांच्या रूपाने निसटता विजय मिळाला. त्याचे श्रेय घेत सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या मंत्रिमंडळात स्वत:चे स्थान पक्के केले होते. त्यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आष्टा येथील वैभव शिंदे यांना भाजपमध्ये घेण्यात आले. यापैकी शिंदे आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत आले आहेत.
राष्ट्रवादीची ताकद भक्कम करण्यासाठी, इस्लामपूर व आष्टा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी जयंत पाटील यांनी वाळवा तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यासाठी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय योजना आपल्या दारी ही योजना राबविली जात आहे याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचा धसका विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे विरोधी आणि तटस्थ असलेले काही कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत.
पालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात असलेले राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची जोडी फुटली आहे. भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक विक्रम पाटील महाडिक युवा शक्ती आणि भाजपचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, गौरव नायकवडी, काँग्रेसचे वैभव पवार यांच्या भूमिका पाहून कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत. त्यामुळेच अनेकजण पालिका निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीमध्ये परतण्यास इच्छुक आहेत. बरेच कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत; परंतु पाटील यांनी त्यांना हिरवा कंदील दाखविलेला नाही.