जयंत आठवले यांना ‘अंनिस’चे आव्हान

By Admin | Updated: October 1, 2015 23:14 IST2015-10-01T23:14:24+5:302015-10-01T23:14:24+5:30

चमत्कार सिध्द करून दाखवा : गंभीर दखल घेणार

Jayant Athavale to challenge 'Anyan' | जयंत आठवले यांना ‘अंनिस’चे आव्हान

जयंत आठवले यांना ‘अंनिस’चे आव्हान

सांगली : सनातन संस्थेचे डॉ. जयंत आठवले गेली अनेक वर्षे अध्यात्माचा प्रचार करण्याचा दावा करीत असले तरी, अध्यात्म व धर्माच्या नावाखाली ते अंधश्रध्दा पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी चमत्काराचे दावेही केले असून, ते चमत्कार सिध्द करून दाखवावेत, असे आव्हान अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिले. डॉ. आठवले यांनी चमत्कार सिध्द न केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. पाटील म्हणाले की, डॉ. जयंत आठवले अध्यात्माचा प्रचार करण्याचा दावा करतात. त्यांनी चमत्काराचे दावे केले आहेत. डॉ. आठवले यांच्या देहातून सुगंधाची निर्मिती होते, ते बोलत असताना आश्रमातील सर्वांच्या तोंडातील लाळ गोड होते, पोटाचे विकार, संधिवात, अपंगत्व आदी शारीरिक आजार विभुती फुंकून व गोमूत्र शिंपडून बरे होतात, केवळ वास्तूच नव्हे, तर दुचाकी, चारचाकी वाहनांचीही शुध्दी करता येते, आदी प्रचार करण्यात येतो. हे सर्व चमत्कार दैवी असून ते खुद्द डॉ. आठवले करतात वा घडवून आणतात, असा त्यांचा दावा आहे. हे सर्व चमत्काराचे दावे त्यांचेच असल्याने, ते सिध्द करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेली २५ वर्षे चमत्कार सिध्द करण्याचे आव्हान देत आली आहे. कोणताही दैवी चमत्कार अस्तित्वात नसल्याबाबत ‘अंनिस’तर्फे वारंवार प्रबोधन करूनही, जर कोणी चमत्काराचा दावा करत असल्यास, तो सिध्द करावा. आमचे आव्हान स्वीकारण्यास तयार असल्यास त्या आशयाचा मसुदा देण्यास ‘अंनिस’ तयार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, प्रियांका तुपलोंढे, राणी कदम, कौस्तुभ पोळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jayant Athavale to challenge 'Anyan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.