अपघातात जवान ठार
By Admin | Updated: January 17, 2016 00:35 IST2016-01-17T00:09:37+5:302016-01-17T00:35:09+5:30
आगळगावजवळ घटना : अज्ञात वाहनाची धडक

अपघातात जवान ठार
ढालगाव : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील जवान नंदकुमार रामचंद्र पाटील (वय ३५) जागीच ठार झाले. शुक्रवारी रात्री आगळगाव फाट्यानजीक हा अपघात झाला.
लष्करात जवान असलेले नंदकुमार पाटील १० जानेवारी रोजी एक महिन्याच्या सुटीसाठी गावी आले होते. शुक्रवारी रात्री ते शिरढोण येथे आलेल्या पाचेगाव (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील मित्राला सोडण्यासाठी बाहेर पडले. जेवण करून मित्राला पाचेगावला सोडून ते रात्री शिरढोणकडे परतत होते. रात्री अकरा वाजता त्यांनी घरी दूरध्वनी करून काही वेळात शिरढोणमध्ये पोहोचत असल्याचे सांगितले, मात्र उशिरापर्यंत ते न आल्याने नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद होता. सकाळी नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता, आगळगाव फाट्यावर झालेल्या अपघाताची माहिती मिळाली. त्या अपघातातील मृत नंदकुमार पाटील असल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर)
शिरढोणवर शोककळा
नंदकुमार पाटील यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच शिरढोण परिसरावर शोककळा पसरली. सामाजिक उपक्रमात ते अग्रभागी असत. नंदकुमार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.