जतला लिपिकासह दोघे लाचखोर जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2015 23:33 IST2015-09-05T23:30:46+5:302015-09-05T23:33:19+5:30
चार हजार घेतले : तहसील कार्यालयात सापळा

जतला लिपिकासह दोघे लाचखोर जाळ्यात
सांगली : शेतजमिनीची खरेदी दस्ताप्रमाणे नोंद घालून त्याचा उतारा देण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या जत तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व त्याचा खासगी मदतनीस या दोघांना रंगेहात पकडले. अनुक्रमे सिद्धू आप्पा शिंदे (वय ४६, रा. जालिहाळखुर्द, ता. जत) व कृष्णदेव रामू बाबर (४५, जनावर बाजाराजवळ, जत) अशी त्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी पावणेबारा वाजता ही कारवाई केली.
वाळेखिंडी (ता. जत) येथील तक्रारदारास शेतजमिनीची खरेदी दस्ताप्रमाणे नोंद घालून त्याचा सातबारा उतारा पाहिजे होता. यासाठी त्यांनी जत तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सिद्धू शिंदे याची भेट घेतली. शिंदे याने उतारा देण्यासाठी त्याचा खासगी मदतनीस बाबर याच्यामार्फत पाच हजार लाचेची मागणी केली. पैसे दिले तरच उतारा देणार, असे त्याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. तसेच त्यांनी लावलेल्या सापळ्याप्रमाणे तक्रारदाराने शिंदे व बाबर यांची पुन्हा भेट घेतली. पाच हजार जास्त होतात, जरा कमी करा, असे सांगितले. त्यावर या दोघांनी चर्चेअंती चार हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
तक्रारदाराने लाचेची रक्कम शनिवारी दुपारी घेऊन येतो, असे सांगितले होते. तत्पूर्वी पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने सापळा लावला. दुपारी पावणेबारा वाजता तक्रादाराकडून चार हजारांची लाच घेताना शिंदेला पकडण्यात आले. जाधव प्रत्यक्षात सापडला नाही, पण त्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिंदेच्या जालिहाळखुर्द येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. (प्रतिनिधी)