जत, तासगाव तालुक्यांस अवकाळीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:38 IST2018-04-11T23:38:34+5:302018-04-11T23:38:34+5:30

जत, तासगाव तालुक्यांस अवकाळीने झोडपले
तासगाव : जत, तासगाव परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सावळज पूर्व भागाला बुधवारी गारांसह पावसाने झोडपले. सायंकाळी पावसाने तासभर दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्याने सावळज येथील अभिषेक पाटील यांच्या घराचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी वीजवाहिन्यांचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
दुष्काळाच्या अधिक झळा बसलेल्या पूर्व भागातील गावांना बुधवारच्या पावसाने चांगलेच झोडपले. या पावसाने काही दिवसांची पाण्याची चिंता दूर झाली आहे. तालुक्यात खोळंबलेल्या द्राक्ष बागांच्या खरड छाटण्यासाठी हा पाऊस गरजेचा होता. त्यामुळे या कामांना आता गती येणार आहे.
जत शहर आणि तालुक्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी सकाळी आठ व दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान वादळी वाºयासह तुरळक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी मका, कापूस, भुईमूग, ऊस या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, तर द्राक्ष, बेदाणा, आंबा, लिंबू, डाळिंब, आदी पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह दहा मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर काही वेळातच कडक ऊन पडले. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान पुन्हा वादळी वाºयासह दहा मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.