जत तालुक्यात शेतमजुरांची दिवाळी, शेतकऱ्यांचे दिवाळे!

By Admin | Updated: February 25, 2015 00:02 IST2015-02-24T23:22:03+5:302015-02-25T00:02:19+5:30

सुगीचे दिवस : चारशे रुपये हजेरी देऊनही माणसे मिळेनात

Jat talukas of the laborers Diwali of farmers, bust! | जत तालुक्यात शेतमजुरांची दिवाळी, शेतकऱ्यांचे दिवाळे!

जत तालुक्यात शेतमजुरांची दिवाळी, शेतकऱ्यांचे दिवाळे!

जत : जत तालुक्यात सुगीचे दिवस सुरू झाल्यामुळे शेतमजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पुरुष शेतमजुरांचा प्रति दिवसाचा पगार चारशे रुपये, तर महिला शेतमजुरांचा पगार दोनशे पन्नास रुपये झाला आहे. याशिवाय शेतमजुरांना त्यांच्या घरापासून काम सुरु असलेल्या ठिकाणी वाहनातून ये-जा करण्याची व्यवस्था करावी लागत आहे. यामुळे शेतजमीन मालक हवालदिल झाले आहेत.जत शहर आणि परिसरात सिंदूर, गुगवाड, दरीकोणूर, शेड्याळ, अचकनहळ्ळी, निगडी खुर्द, मल्लाळ येथील शेतमजूर येथे कामासाठी येत आहेत. त्यांच्या गावातून शेतमजूर कामासाठी जत शहरात येतात. शहरातील वाचनालय चौकात सर्व शेतमजूर दररोज सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान एकत्र येतात.तेथून शेतजमीन मालक कामासाठी त्यांना आपल्या वाहनातून घेऊन जात आहेत. त्यामुळे हमखास शेतमजूर मिळण्याचे ठिकाण म्हणून वाचनालय चौकाचा उल्लेख आता होऊ लागला आहे.फक्त ज्वारी काढणीच्या कामासाठी शेतजमीन मालक मजुरांना घेत आहेत. करडी व गहू काढणीसाठी पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश या राज्यातून आलेल्या मळणी यंत्राचा ते उपयोग करीत आहेत. या यंत्रासाठी प्रति एकर पाचशे ते सहाशे रुपये भाडे आकारणी यंत्र मालक करीत आहेत. या मळणी यंत्राद्वारे तात्काळ मळणी होत आहे. याशिवाय शेतमजूर मिळविण्यासाठी धडपड करावी लागत नाही. त्यामुळे शेतजमीन मालक ज्वारी पिकाऐवजी आता करडी पीक घेण्याकडे आकर्षित होऊ लागला आहे. (वार्ताहर)


मजूर संख्येत घट
तालुक्याच्या ग्रामीण भागातही सुगी सुरु झाली आहे. याशिवाय द्राक्ष काढणी हंगाम जोमात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून कामाच्या शोधात जत शहरात येणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई येथे जाणवू लागली आहे. काहीवेळा प्रति दिवस पाचशे रुपये पगार देऊनही येथे मजूर मिळेनासे झाले आहेत.

Web Title: Jat talukas of the laborers Diwali of farmers, bust!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.