महापालिकेत जयश्रीतार्इंचा शब्द अंतिम
By Admin | Updated: October 20, 2015 23:49 IST2015-10-20T22:06:59+5:302015-10-20T23:49:23+5:30
नगरसेवकांचे साकडे : विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन, मदनभाऊंच्या आठवणीने वातावरण भावूक

महापालिकेत जयश्रीतार्इंचा शब्द अंतिम
सांगली : काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचा शब्द महापालिकेत अंतिम राहणार आहे. मंगळवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जयश्रीतार्इंची भेट घेऊन तशी ग्वाहीही दिली. यावेळी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी जयश्रीतार्इंनी नगरसेवकांना एकसंधपणे शहराच्या विकासाचे काम करावे, असा संदेश देतानाच, मदनभाऊंप्रमाणेच कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेत काँग्रेसअंतर्गत मदन पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. या गटाचे नेतृत्व कोण करणार?, असा प्रश्न होता. सोमवारी महापालिकेतील बैठकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी जयश्रीतार्इंना साकडे घालण्याचा निर्णय घेतला होता.
मंगळवारी शोकसभा झाल्यानंतर सायंकाळी काँग्रेसचे ३० नगरसेवक विजय बंगल्यावर गेले. यावेळी महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी, हारूण शिकलगार, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर यांच्यासह महिला नगरसेविकाही उपस्थित होत्या.
यावेळी महापौर कांबळे म्हणाले की, मदनभाऊंनी कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम केले. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधारच संपला आहे. कार्यकर्त्यांना मायेचे छत्र हवे आहे. आम्ही सर्व भाऊ एकत्र येऊन बहिणीकडे साकडे घालत आहोत. जिवात जीव असेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही राजकारणात सक्रिय व्हा, असे साकडेही त्यांनी घातले. महापालिकेत मदनभाऊंचा शब्द अंतिम होता. तसाच तुमचाही शब्द आमच्यासाठी प्रमाण असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
किशोर जामदार म्हणाले की, मदनभाऊंनी वारणा योजनेसह अनेक उपक्रम हाती घेतले होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. महापालिकेचे नेतृत्व तुम्ही स्वीकारावे, असे त्यांनी सांगितले.
नगरसेवकांच्या भावना ऐकून जयश्रीतार्इंनाही अश्रू अनावर झाले होते. नगरसेवकांनी एकसंध राहावे, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. मदनभाऊंनी कार्यकर्त्यांवर प्रेम केले. तशीच वागणूक यापुढेही कार्यकर्त्यांना मिळेल. कोणालाही अंतर दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मदनभाऊंचा पुतळा : आज होणार निर्णय
महापालिकेच्यावतीने माजी मंत्री मदन पाटील यांचे स्मारक व पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात बुधवारी दुपारी एक वाजता महापौर विवेक कांबळे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेससह राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, तीन पक्षांचे गटनेते व प्रमुख नगरसेवकांची प्रशासनाच्या उपस्थितीत बैठक होईल. या बैठकीत जागा निश्चित होणार असल्याचे महापौर कांबळे यांनी सांगितले.
कोरेंकडून
सांत्वन
‘जनसुराज्य शक्ती’चे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांनी सायंकाळी जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी समित कदम उपस्थित होते.