सांगलीत १९ जानेवारीस बहुजन क्रांती मोर्चा

By Admin | Updated: December 25, 2016 23:47 IST2016-12-25T23:47:48+5:302016-12-25T23:47:48+5:30

नियोजनासाठी बैठक : जिल्हाभरातून तीस संघटनांचा सहभाग

On January 19, the Bahujan Kranti Morcha was held in Sangli | सांगलीत १९ जानेवारीस बहुजन क्रांती मोर्चा

सांगलीत १९ जानेवारीस बहुजन क्रांती मोर्चा

सांगली : बहुजन समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी सांगलीत गुरूवार दि. १९ जानेवारीला बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी रविवारी येथे बैठक पार पडली. या बैठकीत सांगलीतील मोर्चा यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बहुजन क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी रविवारी येथील आरवाडे हायस्कूलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत, १९ जानेवारीला कर्मवीर भाऊराव पाटील चौकापासून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, मराठा, एन.टी., व्ही.जे., एम.बी.सी., एस.बी.सी. व अल्पसंख्याक समूहातील सर्वच धर्मांच्या बंधू-भगिनींना एकत्र आणत मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या सुरूवातीला मुबारक फरास यांनी या आंदोलनाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगत सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साधना कांबळे, चंद्रकांत लोंढे, चंद्रकांत चव्हाण, अरुण खरमाटे, नामदेव करगणे, शेवंता वाघमारे, मुफ्ती जुबेर, सुरेश दुधगावकर, सुरेश चिखले, विजय भोसले, नामदेव कोरे, भारत ऐवळे, शंकर ऐवळे, अर्जुन मजले, राजू गस्ते आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाभरातून ३० सामाजिक संघटनांनी या मोर्चास पाठिंबा दर्शविला असून संयोजन समितीमध्ये आपली नावे समाविष्ट केली आहेत.
यावेळी दत्तात्रय घाडगे, गौतम कांबळे, प्रा. गौतम शिंगे, कैलाश ढोकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
निधीबाबत चर्चा : आर्थिक मदत
बहुजन क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीमध्ये मोर्चास लागणाऱ्या निधीवरही चर्चा झाली. यावेळी जमीर जमादार यांनी एक हजार रुपये निधी मुबारक फरास यांच्याकडे सुपूर्द केला, तर मदन जाधव यांनी एक हजार रुपयांचा निधी नामदेव कोरे यांच्याकडे सुपूर्द केला.

Web Title: On January 19, the Bahujan Kranti Morcha was held in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.