मिरज : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लिंगनूर (ता. मिरज) येथे बोलावून व त्याचवेळी पोलिस आल्याच्या बहाण्याने जळगाव येथील शेअर दलालाला तब्बल २५ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी लिंगनूर येथील लक्ष्मण नाईक या सराईत गुन्हेगारासह सात जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव येथील शेअर दलाल यश दिलीप रडे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, जळगाव, सध्या रा. पुणे) यांना लक्ष्मण नाईक याने संपर्क साधून त्याच्याकडे स्वस्तात सोने असल्याचे सांगितले. यश रडे हे सोने खरेदीसाठी लिंगनूर येथे आल्यानंतर लक्ष्मण नाईक याने आता सोने उपलब्ध नसून सोने आल्यानंतर कळवतो, असे सांगितले. त्यानंतर मार्च महिन्यात नाईक याने सोने आले आहे. रक्कम घेऊन या, असे यश रडे यांना कळवले. यश रडे त्याप्रमाणे २५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन आले. लिंगनूर येथे शेतात सोने दाखवत असताना तेथे पोलिसांच्या वेशात दोघेजण आल्याने सर्वजण तेथून पळून गेले. यावेळी लक्ष्मण नाईक याने सोने व रक्कम पोलिस घेऊन गेले, तुमची रक्कम परत मिळवून देतो, असे सांगून रडे यांना गावी परत पाठवले. रक्कम परत मिळण्यासाठी रडे यांनी महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर नाईक हा टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यश रडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.बनाव करून रक्कम लंपासयाप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण नाईक (रा. लिंगनूर), प्रेम, राजेश, शिवा, एक कानडी भाषा बोलणारा व्यक्ती व पोलिसांच्या वेशात आलेले दोन अनोळखी अशा सात जणांनी स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने खरेदीसाठी आणलेले २५ लाख रुपये पोलिस असल्याचा बनाव करून रक्कम लंपास करत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.संशयित बनावट नोटा प्रकरणातील आरोपीलक्ष्मण नाईक हा कर्नाटकात बनावट नोटा प्रकरणातील आरोपी असून, यापूर्वी त्याच्यावर चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी लक्ष्मण नाईक याच्यासह सात जणांवर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli: स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा, जळगाव येथील शेअर दलालाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:43 IST