सांगली : विले-पार्ले पूर्व, मुंबई येथील जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने पाडले आहे. या घटनेमुळे देशभरातील जैनधर्मीय व्यथित झाले आहेत. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सकल जैन समाजातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. 'लढेंगे - जितेंगे - मंदिर वही बनाऐंगे', 'अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा', 'नहीं चलेगी नही चलेगी - दादागिरी नहीं चलेगी' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जैन श्रावक-श्राविका, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, मंडळे, संस्था सहभागी झाल्या. विश्रामबाग चौकात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा निघाला. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामी, माजी मंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार अरविंद मजलेकर, माजी चेअरमन सागर चौगुले, महामंत्री प्रा. एन. डी. बिरनाळे अग्रभागी होते. खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील, भाजपचे सिद्धार्थ गाडगीळ यांनी मोर्चास पाठिंबा दिला. जैन महिला परिषद, वीरसेवा दल, जैन पदवीधर संघटना, जैन बोर्डिंग व दक्षिण भारत जैन सभा आणि सकल जैन समाजाचे कार्यकर्ते; दिगंबर, श्वेतांबर, मूर्तीपूजक, स्थानकवासी सहभागी झाले. ५०० फूटी पंचरंगी ध्वजाने लक्ष वेधले.भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजी म्हणाले, घाईघाईत मंदिर पाडण्यामागे काहीतरी काळेबेरे आहे. भगवान आदिनाथ, भगवान पार्श्वनाथ आमचे शासक आहेत. जैन मंदिर होते तेथेच उभारल्याशिवाय गप्प राहणार नाही. मंदिर, साधू, तीर्थक्षेत्रावर आघात आता सहन केले जाणार नाही.माजी मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर म्हणाले, न्यायप्रविष्ट बाब असताना घाईघाईत कोणाच्या तरी हितासाठी जैन मंदिर उद्ध्वस्त केले गेले. मंदिर त्याच जागेवर होईपर्यंत जैन समाज शांत बसणार नाही.भालचंद्र पाटील म्हणाले, जैन समाज शांतीप्रेमी व अहिंसक आहे, मात्र आम्ही कुणाला घाबरत नाही. जैन समाजाने दाखवलेली एकी ही आमची ताकद आहे. दक्षिण भारत जैन सभा पूर्ण क्षमतेने या प्रकरणात लढा उभा करेल.
आंदोलनास सर्वसमाजाचा पाठींबारावसाहेब पाटील म्हणाले, आमच्या भूमिकेला मराठा, लिंगायत, धनगर, मुस्लिमांसह बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा आहे. लोकांना चूक आणि बरोबर कळते, ते अधिकाऱ्यांना का कळाले नाही. रोहन मेहता, डॉ. अजित पाटील, अर्चना गाट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी मनोगत व्यक्त केले.
ड्रोनवरून पोलिस, आंदोलकांत जुंपलीमोर्चाचे छायाचित्रण ड्रोनद्वारे केले जात होते. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकांनी ड्रोनला परवानगी घेतली नसल्याने ते बंद करण्याचे आदेश दिले. त्यावर आमदार यड्रावकर-पाटील चिडले. त्याची पोलिसांशी हुज्जत झाली. मोर्चातील लोकांनी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करत वालचंद महाविद्यालयासमोर रस्त्यावर ठाण मांडले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ड्रोनला मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि त्यानंतर चित्रीकरण सुरू झाले.