कारागृह कवलापूरला होणार!

By Admin | Updated: October 6, 2015 00:35 IST2015-10-05T23:33:57+5:302015-10-06T00:35:19+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव : २५ एकर जागेची मागणी

Jail to be held in Kallalpur! | कारागृह कवलापूरला होणार!

कारागृह कवलापूरला होणार!

सचिन लाड --सांगली-जिल्हा मध्यवर्ती कारागृहासाठी कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कारागृह, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधण्यासाठी २५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना कारागृह प्रशासनाने सादर केला आहे. यावर पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन-अडीच वर्षात सांगलीचे कारागृह कवलापूरला स्थलांतरित होईल.सांगली व आटपाडी याठिकाणी दोन कारागृहे आहेत. सांगलीच्या कारागृहात कच्च्या कैद्यांना ठेवले जाते. आटपाडीतील स्वतंत्रपूर येथे खुले कारागृह आहे. तिथे शिक्षा लागलेल्या कैद्यांना कुटुंबासह राहण्याची सोय आहे. सांगलीचे कारागृह सव्वादोनशे क्षमतेचे आहे. गेल्या काही वर्षात कारागृह परिसरात लोकवस्ती वाढल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कारागृह स्थलांतर करण्याची चर्चा सुरू होती. यासाठी दोन महिन्यांपूर्वी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी कारागृह स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी त्यांनी चर्चा करून जागा देण्याची विनंती केली होती. जागेच्या विषयावर चर्चाही झाली. या चर्चेतून कवलापूर येथील नियोजित विमानतळाची जागा पडून असल्याने, ती घेण्याचे ठरले होते. त्यानुसार कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी महिन्यापूर्वी कवलापूर येथे जाऊन त्या जागेची पाहणी केली होती.
ही विमानतळाची जागा औद्योगिक विकास महामंडळाच्याताब्यात आहे. आरटीओ कार्यालयानेही या जागेवर डोळा ठेवला आहे. दीडशे एकर जागा असल्याने ती कारागृह व आरटीओ कार्यालयास सहजपणे मिळू शकते. पण सध्या कारागृहास ही जागा तातडीने देण्याच्या हालचाली सुरु आहेत. सांगलीपासून नऊ किलोमीटर अंतरावर ही जागा आहे. त्यामुळे आरोपींना ने-आण करण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने हे अंतर अत्यंत कमी आहे. कारागृह प्रशासनाने २५ एकर जागा देण्याची मागणी केली आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान, तसेच कारागृहाची इमारत बांधली जाणार आहे. कवलापूर आणि बुधगाव या दोन्ही गावांच्या मध्यभागी ही जागा आहे. कवलापूरच्या ग्रामस्थांनी येथे कारागृह बांधण्यास विरोध केला आहे.


कवलापुरातील नियोजित विमानतळाच्या जागेतील २५ एकर जागा द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. जागा मिळाल्यानंतर पुढील कामाला उशीर लागणार नाही. येत्या दोन-अडीच वर्षात कारागृह व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान तयार होऊ शकते.
- एम. एस. पवार,
कारागृह अधीक्षक, सांगली.

कारागृह तुडुंब
जिल्हा कारागृहात दिवसेंदिवस कच्च्या कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्याच्या स्थितीला पावणेचारशे कैदी आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी झाले असल्याने कारागृह अपुरे पडू लागले आहे. आजूबाजूला लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे कवलापूरच्या जागेत तातडीने कारागृह स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरु आहेत. प्रथम जागा मंजूर झाल्यास पुढील कामाला गती येणार आहे. नव्या जागेत कैद्यांच्या वाढीव क्षमतेचे कारागृह बांधण्याचा विचार सुरु आहे.

Web Title: Jail to be held in Kallalpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.