आमदारांवर आरोप करणारे जगताप समर्थक रोहयोमधील दरोडेखोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:50+5:302021-03-17T04:26:50+5:30
जत : आमदार विक्रम सावंत यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा राजीनामा मागणारे माजी आमदार विलासराव जगताप समर्थक रोजगार हमी ...

आमदारांवर आरोप करणारे जगताप समर्थक रोहयोमधील दरोडेखोर
जत : आमदार विक्रम सावंत यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा राजीनामा मागणारे माजी आमदार विलासराव जगताप समर्थक रोजगार हमी योजनेतील दरोडेखोर आहेत, असा आरोप मंगळवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार, कार्याध्यक्ष सुजय शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माळी, अभिजीत चव्हाण, महादेव कोळी, विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, निलेश बामणे, मारुती पवार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, युवक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष विकास माने उपस्थित होते.
ते म्हणाले की, माजी आमदार जगताप यांच्या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. आता आरोप करणारे दरोडेखोर त्यात सामील होते. गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर या दरोडेखोरांमुळे फौजदारी कारवाई झाली आहे. हा गैरव्यवहार जगताप यांच्या आशीर्वादाने झाला आहे. विधानसभा निवडणुकीत स्वत:ची खळगी भरण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांनी वेगळी चूल मांडून जनतेला फसविले आहे. आमदार सावंत निवडून आल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. तुबची-बबलेश्वर योजनेसंदर्भात सतत उलटसुलट चर्चा केली जात आहे. पूर्वभागातील शेतकऱ्यांकडे जाऊन माहिती घेऊन विरोधकांनी टीका करावी.
चौकट
भाजपमध्येच चार गट
तालुक्यात काँग्रेस पक्ष एकसंघ आहे, परंतु भाजपमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील, विलासराव जगताप व खासदार संजयकाका पाटील यांचे वेगवेगळे गट आहेत. त्यांनी आमच्याकडे बोट दाखवू नये, असा टोला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लगावला.