ढवळीत जलसिंचन योजनेचा जॅकवेल कृष्णा नदीत कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:32+5:302021-09-16T04:33:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : ढवळी (ता.मिरज) येथे कृष्णा नदीकाठावरील वसंतदादा उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचा जॅकवेल बुधवारी नदीत ...

ढवळीत जलसिंचन योजनेचा जॅकवेल कृष्णा नदीत कोसळला
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : ढवळी (ता.मिरज) येथे कृष्णा नदीकाठावरील वसंतदादा उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचा जॅकवेल बुधवारी नदीत कोसळला. जॅकवेलमध्ये असलेले टर्बाइन व विद्युत मोटारी पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या या जलसिंचन योजनेचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे ढवळीसह परिसरातील सुमारे ३०० एकर शेतीच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे.
पावसाने कोयना व इतर धरणातून विसर्ग सुरू केल्याने गेल्या चार दिवसांत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. ढवळी गावात नदीपात्रालगतचा मातीचा भराव खचल्याने एका बाजूला कललेला जॅकवेल बुधवारी सकाळी नदीत कोसळला. जॅकवेल कृष्णा नदीच्या पाण्यात पडल्याने मोठा आवाज झाला. शेतकऱ्यांच्या खासगी सिंचन योजनेच्या जॅकवेलमध्ये असलेल्या ५० अश्वशक्तीच्या दोन विद्युत मोटारी, पंपसेट टर्बाइन नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
ढवळीत बेसुमार वाळू, माती उपशामुळे दोन वर्षापूर्वी महापुरामुळे सिंचन योजनेची इनटेक वाहून गेले. यामुळे जॅकवेललाही धोका निर्माण झाला होता. गेल्या महिन्यात नदीला आलेल्या पुरानंतर या जॅकवेलला धोका असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. यामुळेच जॅकवेल नदीपात्रात कोसळल्याची तक्रार सरपंच बाळू चिपरे यांनी केली आहे. ढवळी परिसरातील १७७ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हा भूविकास बँकेचे कर्ज घेऊन २० वर्षांपूर्वी वसंतदादा सहकारी उपसा जलसिंचन योजना सुरू केली होती. जॅकवेल व मोटारी वाहून गेल्याने पर्यायी व्यवस्था करून, शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सरपंच बाळू चिपरे यांनी सांगितले.