स्मृतिदिनानिमित्त वाळव्यात नागनाथअण्णांच्या विचारांचा जागर
By Admin | Updated: March 19, 2015 00:01 IST2015-03-18T22:53:23+5:302015-03-19T00:01:55+5:30
वैभव नायकवडी : आजच्या युवकांनी अण्णांचे ऐतिहासिक कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवावे

स्मृतिदिनानिमित्त वाळव्यात नागनाथअण्णांच्या विचारांचा जागर
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचा स्मृतिदिन हा त्यांच्या विचारांचा जागर व तत्त्वांची जपणूक करण्यासाठी आपण साजरा करतो. कार्यक्रमास युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, कारण या निमित्ताने अण्णांचे अभूतपूर्व व ऐतिहासिक कार्य त्यांच्यासमोर येईल, व त्यांच्या माध्यमातून ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.नागनाथअण्णा स्मृतिदिन सोहळ्याच्या नियोजनासाठी हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्षेत्रातील १५ गावांतील कार्यकर्ते व स्मृतिदिन सोहळ्याच्या कमिट्यांच्या सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, कारखान्याचे प्रभारी संचालक जी. एस. कुदळे, माजी अध्यक्ष महादेव कांबळे, बॅँकेचे कार्यकारी अधिकारी सुबराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नायकवडी म्हणाले की, अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आपण एकत्र येतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हुतात्माच्या परंपरेप्रमाणे सोहळा नेटकाच होईल. साधारणपणे ५० हजारांहून अधिक लोक कार्यक्रमास उपस्थित राहतील.
यावेळी प्रा. आनंदराव शिंदे, प्रा. मधुकर वायदंडे, प्रा. हाशिम वलांडकर, प्रा. बाळासाहेब नायकवडी, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. धरणग्रस्त नामदेव नांगरे म्हणाले की, अण्णांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी १६५ मोर्चे व ४७ वेळा धरणे आंदोलन केले. म्हणूनच आज आम्हाला न्याय मिळाला.
अण्णांच्या स्मृतिदिनासाठी २० हजार निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी मंडप उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. व्यासपीठ, मंडपस्थळी प्रवेशद्वार व कमानी उभारण्याचे काम सुरु आहे. समाधीस्थळी मंडप उभारण्यात आला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था कारखाना कार्यस्थळी करण्यात आली आहे. मंडपस्थळी स्फूर्तिगीत, भावगीत व क्रांतिगीते सादर केली जाणार आहेत.
२२ मार्चला सकाळी सात वाजता हुतात्मा किसन अहिर, जिजामाता विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी सर्व गावातील मुख्य मार्गावरुन काढण्यात येणार आहे. २0 कमिटीच्या सदस्यांनी आपली कामे पूर्णत्वाकडे नेली आहेत.
यावेळी सरपंच गौरव नायकवडी, दूध संघाचे उपाध्यक्ष जयवंत अहिर, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, मुख्याध्यापक एस. पी. होरे, सुबराव गावडे, मुख्याध्यापिका एस. व्ही. कांबळे, बाळासाहेब पाटील, मोहन सव्वासे, शिवाजी सापकर, बबन हवालदार, विठ्ठल चौगुले, अशोक माने, भगवान अडिसरे, बी. टी. घारे, गंगाराम सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी यांच्यासह संकुलातील सर्व कार्यकर्ते, कामगार, सभासद उपस्थित होते. (वार्ताहर)