लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीतील शंभरफुटी रस्ता कित्येक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. गॅरेजवाले, हातवाडीवाल्यांच्या अतिक्रमणाने हा रस्ता वाहतुकीसाठी अवघा २५ फूटसुद्धा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे शहराबाहेरील वाहतुकीचा ताण गावठाणातील रस्त्यावर पडतो. त्यातच महापुरानंतर या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा रस्ता असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेनेही याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. रस्ता दुरुस्ती, अतिक्रमणमुक्तीच्या घोषणा मात्र उदंड केल्या आहेत.
विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयापासून कोल्हापूर रस्त्यापर्यंत शंभरफुटी रस्ता हा केवळ नावालाच शंभरफुटी उरला आहे. अनेक गॅरेज मालक, दुकानदारांनी या रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी वीज आणि टेलिफोनचे लोखंडी खांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. हा रस्ता व्यवस्थित झाल्यास अवजड वाहने, बसेस या मार्गाने वळविल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू केल्यास डॉ. आंबेडकर मार्गावरील बराचसा ताण कमी होणार आहे.
आतापर्यंत महापालिकेने अनेकदा शंभरफुटी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात सातत्य नसल्याने अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्टच होत गेला आहे. ड्रेनेज योजनेसाठीही अनेक रस्त्यांची खोदाई केली जाते. दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्याने या रस्त्यावरून जाणेच मुश्किलीचे ठरत आहे.
त्यात नुकत्याच आलेल्या महापुरानंतर रस्त्याची पुरती वाट लागली आहे. कोल्हापूर रस्त्यापासून ते डी मार्टपर्यंतचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात अतिक्रमणामुळे खड्डाही चुकवता येत नाही. या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. आमदार, खासदारांसह महापालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिलेले नाही.
चौकट
१८ कोटी प्रस्ताव धूळखात
कोल्हापूर रस्ता ते महावितरण कार्यालयापर्यंतच्या या शंभरफुटी रस्त्यावर दोन्ही बाजूला बॅरिकेट्स, रस्त्याच्या मधोमध दुजाभक, दोन ठिकाणी आयलँड, ठिकठिकाणी गटारांचे बांधकाम, संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण असा १८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पण त्यासाठी शासनाकडे निधी मागायचा की जिल्हा नियोजन समितीकडे, याचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
चौकट
शहरातील रस्त्याच्या पॅचवर्कचे काम महापालिका यंत्रणेमार्फत सुरू आहे. टिंबर एरिया परिसरातील खड्डे बुजवले जात आहेत. त्यानंतर शंभर फुटी रस्त्यावर पॅचवर्कचे काम हाती घेणार आहोत. लवकरच हा रस्ता खड्डेमुक्त होईल.
- परमेश्वर हलकुडे, नगर अभियंता.