शनिवार, दि. १८ सप्टेंबर रोजी कडेपूर येथील यादव मळा येथे एका घरात घोरपड आढळून आली. या घोरपडीस पकडण्यासाठी सर्पमित्र दादासाहेब पोळ याला बोलावण्यात आले होते. पोळ याने घोरपड पकडली आणि दुचाकीवरून घेऊन गेला. यानंतर वन विभागाचे अधिकारी डॉ. अजित साजने, कडेगावच्या वन परिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांना ही माहिती मिळाली.
अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, दादासाहेब पोळ घोरपड घेऊन त्याच्या शेतात गेल्याचे समजले. अधिकाऱ्यांनी कडेपूर-विटा रस्त्यावरील त्याच्या शेतीमधील गोठ्यावर जाऊन तपासणी केली असता, घोरपडीचे अवयव जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्याठिकाणी त्याचा मुलगा हर्षल पोळ हजर होता. त्याच्याकडे चौकशी केली असता, घोरपडीस वन विभागाच्या ताब्यात दिल्याचे किंवा वन विभागाच्या परवानगीने नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे आढळून आले नाही. अधिकाऱ्यांनी घोरपडीचे अवयव, मांस पंचासमक्ष ताब्यात घेतले व हैदराबाद येथील प्रयोगशाळेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.
याप्रकरणी दादासाहेब पोळ व हर्षल पोळ यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पडकण्यात आले असून, अधिक तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.