वाळव्यातून सांगलीत येण्यास उशीर झाला!
By Admin | Updated: May 21, 2015 00:10 IST2015-05-20T23:06:03+5:302015-05-21T00:10:22+5:30
दिलीपतात्या पाटील : ही खंत नव्हे, माझ्या राजकीय प्रवासाचे वर्णन..

वाळव्यातून सांगलीत येण्यास उशीर झाला!
सांगली : राजारामबापू उद्योग समूहातील अनेक संस्था, उपसा सिंचन प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविण्यात मला यश मिळाले. यासाठी मला बराच कालावधी मिळाला. त्यामुळे वाळवा तालुक्यातून सांगलीपर्यंत येण्यास मला उशीर झाला, अशी भावना जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, ही खंत नव्हे, माझ्या राजकीय प्रवासाचे वर्णन आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
ते म्हणाले की, राज्यातील सर्वात आदर्श संस्था म्हणून आमच्या अनेक संस्थांचा गौरव झालेला आहे. या संस्थांची जबाबदारी माझ्यावर सोपविली, तेव्हा अनेक अडचणी होत्या. वस्त्रोद्योग अडचणीत असताना मला सूतगिरणीची जबाबदारी दिली. अथक् प्रयत्नानंतर एक आदर्श सूतगिरणी उभारण्यात यश आले. संस्था, प्रकल्प आणि योजना राबविताना काम करण्यासाठी बराच कालावधी मिळाला. त्यामुळेच सांगलीपर्यंत येण्यास थोडा उशीर झाला.
ही खंत आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले की, ही खंत नाही, माझ्या राजकीय प्रवासाची माहिती आहे. कोणतीही वाढ नैसर्गिक असावी, असे माझे मत आहे. अशीच नैसर्गिक वाढ झाल्यामुळे आता जिल्हा बँकेपर्यंत मी पोहोचलो आहे. राजकारणात अनेकांना लगेच संधी मिळत असली तरी, वेगवेगळ्या मातीचा तो गुणधर्म आहे. काही ठिकाणी शेती लगेच पिकते, काही ठिकाणी पीक यायला उशीर होतो.
बँकेतील वादग्रस्त गैरव्यवहार प्रकरणांविषयी ते म्हणाले की, या गोष्टी आता न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. तरीही यापुढील काळात चांगला कारभार निश्चितपणे दिसून येईल. पारदर्शी कारभारावर लक्ष केंद्रित केले जाईल. प्रशासकांनी गेल्या तीन वर्षात जो कारभार केला, तो अत्यंत चांगला आहे. त्यांनी सुरू केलेल्या सर्व चांगल्या योजना, गोष्टी आम्ही पुढे चालू ठेवू. जिल्हा बँकेतील कारभाराचा मला अनुभव नाही. त्याविषयीचा अभ्यासही अद्याप केलेला नाही. अभ्यास करून बँकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने करू. पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँका जशा नावाजलेल्या आहेत, तसाच नावलौकिक किंवा त्याहून अधिक चांगला कारभार करणार आहोत. (प्रतिनिधी)
नोकरभरती पारदर्शीच
लवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरती होणार आहे. ही भरती कशी होईल, याविषयी शंका उपस्थित होत असल्या तरी, आम्ही पारदर्शीपणाने ही भरती करणार आहोत. कोणतीही शंका उपस्थित होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.