सहकार चळवळ मोडून काढणे कोणालाही शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:24+5:302021-09-17T04:32:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : संपूर्ण देशाला समृद्धीचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला ...

It is not possible for anyone to break the co-operative movement | सहकार चळवळ मोडून काढणे कोणालाही शक्य नाही

सहकार चळवळ मोडून काढणे कोणालाही शक्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संपूर्ण देशाला समृद्धीचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे केले.

वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र विधानभवन व गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळा समितीच्यावतीने मुंबई येथे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी सहकारतपस्वी, माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीनिमित्त ‘प्रेरणोत्सव’ कार्यक्रम पार पडला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जन्मशताब्दी सोहळा समितीचे कार्याध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, कार्याध्यक्ष तथा राज्यमंत्री विश्वजीत कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे, रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते गुलाबराव पाटील यांच्या जीवनकार्यावरील चित्रफितीचे अनावरण यावेळी करण्यात आले.

ठाकरे म्हणाले की, आपण बोलून दमून जावे एवढे भव्य काम एखादी व्यक्ती आयुष्यात करू शकते हे गुलाबराव पाटील यांच्या कामातून दिसून येते. त्यांनी आयुष्य कमी पडेल एवढे भले मोठे काम सहकारात करून दाखवले. सहकार चळवळ अधिक चांगल्याप्रकारे पुढे नेताना जर सहकार क्षेत्रात चुका करून काही लोक ही चळवळ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा प्रवृत्तींना नाहीसे केले पाहिजे. सहकारात देखील बदल घडण्याची गरज आहे. सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी सरकार खंबीरपणे उभी राहील.

रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, सहकार कार्यकर्त्यांची नावीन्यपूर्ण चळवळ भविष्यात होणे गरजेचे आहे. गुलाबराव पाटील यांची कारकिर्द आणि त्यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा केवळ उल्लेख न करता त्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणे गरजेचे आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, सहकार क्षेत्रात भरीव काम करून दिशा देण्याचे कार्य गुलाबराव पाटील यांनी केले. सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकार क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गुलाबराव पाटील यांच्या उल्लेखाशिवाय तो पूर्ण होऊ शकणार नाही.

जयंत पाटील म्हणाले, आज महाराष्ट्रातील सहकार चळवळ वेगळ्या वळणावर आहे. सरकारने गुंतवणूक करून ज्या संस्था सुरू केल्या त्या संस्थांच्या सध्याच्या स्थितीबाबतचा अभ्यास करायला हवा. सहकार क्षेत्रात अलिकडे नवीन बदल घडत आहेत. त्यामुळे नागरी सहकारी बँका आणि सहकाराचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.

विश्वजित कदम म्हणाले, सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जेथे सहकार चळवळ सुरू झाली. गुलाबराव पाटील यांच्या सहकार चळवळीचा वारसा तरुण पिढीने पुढे नेण्याचे काम करायला हवे. आभार अंकुश ठाकरे यांनी मानले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे पाठविलेला संदेश पृथ्वीराज पाटील यांनी वाचून दाखविला.

चौकट

सहकार परिषद आयोजित करा : ठाकरे

एकविसाव्या शतकातील सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेणे, या क्षेत्रातील उणिवा आणि दोष दूर करण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषदेच्या आयोजनातून विचारमंथन घडवून आणावे, अशी सूचना ठाकरे यांनी यावेळी केली.

Web Title: It is not possible for anyone to break the co-operative movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.