loksabha: प्रतीक पाटील मैदानात उतरले तरी काहीच फरक पडत नाही, जनता माझ्यासोबत - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 01:16 PM2023-11-25T13:16:45+5:302023-11-25T13:19:31+5:30

माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही

It doesn't matter if Prateek Patil contests in Lok Sabha Hatkanangle constituency says Raju Shetty | loksabha: प्रतीक पाटील मैदानात उतरले तरी काहीच फरक पडत नाही, जनता माझ्यासोबत - राजू शेट्टी

loksabha: प्रतीक पाटील मैदानात उतरले तरी काहीच फरक पडत नाही, जनता माझ्यासोबत - राजू शेट्टी

सांगली : `हातकणंगले मतदारसंघाच्या रिंगणात जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. मात्र त्याचा कोणताही फरक पडणार नाही` असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. `माझा मतदार ठरलेला आहे. माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही. प्रतीक किंवा सध्याचे खासदार यांची चिंता मला वाटत नाही` असे ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले, ऊस आंदोलनात प्रकाश आवाडे किंवा अन्य कोणत्याही नेत्याला, कारखान्याला टार्गेट केले नव्हते. शेतकऱ्यांना चार जादा पैसे मिळावेत हीच भूमिका होती. त्याला यश आले. १०० रुपयांवर तोडगा निघाला असला, तरी त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आंदोलन कुठवर ताणायचे याचे भानही ठेवणे महत्त्वाचे होते.

माझ्या आयुष्यातील सर्वाधिक म्हणजे ३८ दिवस चाललेले हे आंदोलन ठरले. महामार्गावर चक्का जाम करण्याच्या दिवशी पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना उचलले. माझे पंख छाटण्याचे प्रयत्न केले. सकाळी मी मोबाइलवरून आंदोलनाच्या आवाहनाची चित्रफीत प्रसारित केली. त्यासरशी १५ हजारांवर शेतकरी महामार्गावर आले. त्यामुळे लोक सोबतीला असतील तर कोणतेही आंदोलन यशस्वी होते, हे दिसून आले. द्राक्षे किंवा बेदाणा दरासाठीच्या आंदोलनात शेतकरी सोबत येत नाहीत. पण आता दुधासह द्राक्ष व बेदाण्यासाठीही आवाज उठवायचा आहे.

कोल्हापुरातील तोडग्यानंतर सांगलीतही आंदोलन सुरू करणार होतो. कारखानादारांनी रविवारी (दि. २६) कडेगावमध्ये बैठक आयोजित केली आहे. तेथील निर्णय पाहून पुढील दिशा ठरवू. त्यांनी कोल्हापूरप्रमाणे पैसे दिले नाहीत, तर कोल्हापुरातील कार्यकर्ते आता रिकामेच आहेत हे लक्षात ठेवावे. कोल्हापूरपेक्षा मागे हटणार नाही हे निश्चित.

पालकमंत्री कशासाठी असतो?

शेट्टी म्हणाले, सांगलीच्या कारखान्यांविषयी पालकमंत्र्यांशी बोललो, तर ते या विषयांवर दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचे म्हणाले. मग त्यांनी आतापर्यंत काय केले? पालकमंत्री कशासाठी असतो? पोरं एकमेकांच्या उरावर बसून झिंज्या उपटत आहेत. पालकमंत्री काहीच का करत नाही? त्यांचे काही काम नाही का? असा प्रश्न पडतो. ते लक्ष घालणार नसतील तर आम्हाला मध्ये पडावे लागेल. शेतीच्या पाण्यासाठी प्रसंगी कोयनेचा चौथा टप्पा बंद करून समुद्रात सोडले जाणारे ६० टीएमसी पाणी शेतीला वळवावे लागले. वीज विकत घेता येईल, पण पाणी आणता येणार नाही.

दूध व्यवसायात तीन डॉन

शेट्टी म्हणाले, दूध व्यवसायात तिघे डॉन आहेत. दुधाचे दर तेच ठरवितात. कोरोनाकाळात जागतिक पातळीवर लोण्याची भाववाढ होण्याच्या अंदाजाने त्यांनी दर ३८ रुपयांवर नेले, पण नुकसान होत असल्याचे पाहून एकदम २६ रुपयांवर आणले. राज्यातील अन्य संस्थांनी मात्र दर स्थिर ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दूध दरासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत.

Web Title: It doesn't matter if Prateek Patil contests in Lok Sabha Hatkanangle constituency says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.