जतच्या राजकारणाशी देणे-घेणे नाही
By Admin | Updated: April 10, 2015 23:47 IST2015-04-10T22:58:55+5:302015-04-10T23:47:07+5:30
पी. आर. पाटील : राजारामबापू साखर कारखान्याची बदनामी नको

जतच्या राजकारणाशी देणे-घेणे नाही
इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याने राज्य बँकेकडून सिक्युरिटायझेशन अॅक्टखाली जत-तिप्पेहळ्ळी साखर कारखाना विकत घेतला आहे़. निविदा मंजूर झाल्यानंतर आम्ही मुदतीत ४७ कोटी ८६ लाख भरले़ जत तालुक्यातील उपलब्ध उसापैकी ७५ टक्के ऊस जत-तिप्पेहळ्ळी युनिटमध्ये गाळप केला आहे. अशी वस्तुस्थिती असताना जतच्या स्थानिक राजकीय वादात विनाकारण आमच्या कारखान्यास ओढण्यात आले, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी दिली.
जतचे माजी आमदार उमाजी सनमडीकर, विक्रम सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी़ एम़ पाटील यांनी राजारामबापू कारखान्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांना प्रत्युत्तर देताना पाटील बोलत होते़ कारखान्याने साटेलोटे करून जत-तिप्पेहळ्ळी कारखाना विकत घेतला. तिसरा गळीत हंगाम सुरू असतानाही ४८ कोटीपैकी फक्त ११ कोटीच भरले आहेत़, तसेच तालुक्यातील फक्त पाच टक्केच ऊस राजारामबापू कारखान्याने गाळप केला आहे, हे सर्व आक्षेप खोटे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, जेव्हा आम्ही जत साखर कारखाना राज्य बँकेकडून विकत घेतला, तेव्हा बँकेत आणि जत कारखान्यात लोकनियुक्त संचालक मंडळ नव्हते, तर शासननियुक्त प्रशासक होते़ त्यामुळे कोणाही व्यक्तीशी साटेलोटे करण्याचा, कोणाचा आशीर्वाद असण्याचा संबंध येतो कोठे? राज्य बँकेने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन निविदा मागविली होती. आम्ही ती निविदा भरली आणि आमची बोली जास्त असल्याने आम्हास कारखाना विकत दिला़ आम्ही १३ फेब्रुवारी २0१२ रोजी निविदेसोबत ४ कोटी ७८ लाख बयाणा रक्कम भरली होती़ आमची निविदा मंजूर झाल्यानंतर ४८ तासात म्हणजे १५ फेब्रुवारी २0१२ रोजी २५ टक्केतील उर्वरित रक्कम ७ कोटी १८ लाख भरले़ त्यानंतर उर्वरित ७५ टक्के रक्कम ३५ कोटी ८९ लाख ५0 हजार २१ नोव्हेंबर २0१२ रोजी भरल्याने राज्य बँकेने आम्हास २२ नोव्हेंबर २0१२ रोजी कारखान्याचा ताबा दिला़
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, इरिगेशन कमिटीचे अध्यक्ष ए़ टी़ पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली, शेती अधिकारी आबासाहेब पाटील उपस्थित होते़ (वार्ताहर)
पुढील हंगामासाठी उसाच्या नोंदी सुरू
सध्याच्या गळीत हंगामात जत तालुक्यात दीड लाख टन ऊस उपलब्ध होता़ त्यातील ७५ टक्के ऊस आम्ही जत युनिटमध्ये गाळला आहे़ पुढच्या गळीत हंगामासाठी आताच आमच्याकडे ५00 हेक्टर उसाची नोंद झाली असून अद्याप नोंदी चालू आहेत़ आम्ही आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच संस्था राजकारणविरहित चालवत आहोत़ आमचा जतच्या स्थानिक राजकारणात संबंध नाही. जतच्या नेत्यांनी एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करताना तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या संस्थांना त्यात ओढू नये, असा सल्लाही यावेळी पाटील यांनी दिला़