संघटनांच्या वादात पगारवाढीचा निर्णय लटकला
By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T23:11:28+5:302016-06-15T00:03:19+5:30
जिल्हा बँक : कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर; पुढील बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन

संघटनांच्या वादात पगारवाढीचा निर्णय लटकला
सांगली : कर्मचाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या संघटनांच्या वादात जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय लटकला. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय होईल या अपेक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा, निर्णयाविना बैठक संपल्याने मोठा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. पगारवाढीचा प्रस्ताव सांगलीच्या को-आॅप. बँक्स एम्प्लॉईज युनियनने दिला होता. संघटनेने १५ ते १८ टक्के पगारवाढीची मागणी केली होती. अध्यक्षांसह संचालकांनी हा निर्णय अभ्यासाअंती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतचा अभ्यास सुरू असला तरी अंतिम निर्णयाप्रत येण्यासाठी आणखी काही दिवस तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. संचालकांनी ही तांत्रिक बाजू मांडली असली तरी दोन युनियनच्या वादात पगारवाढीचा निर्णय लांबणीवर गेल्याची चर्चा जिल्हा बँकेत होती.
सांगली व कोल्हापूर अशा दोन युनियनचा पूर्वीपासून वाद आहे. एका संघटनेने प्रस्ताव देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. आता पगारवाढीच्याच प्रस्तावावर दुसऱ्या संघटनेशीही चर्चा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)