प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:15+5:302021-02-11T04:28:15+5:30
सांगली : मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हा परिषद मुख्य ...

प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडविणार
सांगली : मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन आठवड्यात प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे माधवराव पाटील, जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जि. प. अध्यक्षा कोरे यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माधवराव पाटील म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रशासनाला आमचे शिक्षक निश्चित साथ करणार आहेत. त्यासाठी शिक्षक व अन्य यंत्रणा चिकाटीने कामाला लागलेली आहे. मात्र, शिक्षण विभागाला कायमस्वरुपी अधिकारी नसल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे. शिक्षकांचेही प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. गुणवत्ताप्राप्त शिक्षक असूनही वरिष्ठ मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या पदांच्या पदोन्नती झाल्या नाहीत. याचा परिणाम गुणवत्तेवर होत असून याचा गांभीर्याने विचार करुन पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा. शिक्षकांना अतिरिक्त कार्यभार देऊ नये. या मागण्यांचा गांभीर्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी विचार करुन सोडवाव्यात अशी मागणीही त्यांनी केली.
यावर प्राजक्ता कोरे यांनी आठवड्यात ज्येष्ठता यादी तयार करुन पदोन्नती देण्याबाबत मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. अतिरिक्त कामाबाबतही तोडगा काढण्यात येणार आहे, असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील गुरव, कार्याध्यक्ष सुरेश पवार, कोषाध्यक्ष राजू राजे, पार्लमेंटरी अध्यक्ष विकास शिंदे, सरचिटणीस वसंत सावंत, धनराज पाटील, भारत क्षीरसागर, बाजीराव पाटील, दयासागर बन्ने, सुरेश शिंगाडे, माणिक माळी, अशोक परीट, गौतम कांबळे, संतोष गुरव आदी उपस्थित होते.
चौकट
महागाई भत्त्याची रक्कम तत्काळ मिळणार
जानेवारी महिन्याचा पगार, सहा महिन्याची थकीत महागाई भत्त्याची रक्कम व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची पेन्शन तत्काळ मिळाली पाहिजे, अशी मागणी माधवराव पाटील यांनी केली. यावेळी जानेवारीचा पगार व महागाई भत्त्याचे फरक बिल अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे वरिष्ठ वित्त लेखा अधिकारी व कनिष्ठ वित्त लेखा अधिकारी यांनी आश्वासन दिले.