आष्ट्यात जमीन हस्तांतरप्रश्नी गैरव्यवहार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:04+5:302021-04-02T04:28:04+5:30
आष्टा : आष्टा शहरातील जागेवरील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे नाव कमी करून शासनाचे नाव लावण्यात आले असून, पालिकेने तेथे होणाऱ्या कोणत्याही ...

आष्ट्यात जमीन हस्तांतरप्रश्नी गैरव्यवहार नाही
आष्टा : आष्टा शहरातील जागेवरील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे नाव कमी करून शासनाचे नाव लावण्यात आले असून, पालिकेने तेथे होणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही. याबाबत कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. लवकरच पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन मार्ग काढणार आहोत, अशी माहिती आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे व झुंजारराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिंदे म्हणाले की, विरोधक पूर्णपणे जनतेची दिशाभूल करत आहेत. जाणून-बुजून विकासाला खीळ घालण्याचे प्रयत्न करत आहेत. माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे व जयंत पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत शहरात विकासाच्या योजना राबवल्या आहेत.
पाटील म्हणाले की, शासनाची जागा शासनाने परत घेतली आहे. यात नगराध्यक्ष, गटनेते किंवा सत्ताधारी गटाचा संबंध नाही. त्यापैकी फक्त ४९ गुंठे जागा गॅस प्लँटसाठी मागणी करण्यात आली आहे. मात्र याबाबत पालिकेने मंजुरी दिलेली नाही. २.४६ हेक्टर जमीन पंतप्रधान घरकुल योजनेसाठी राखून ठेवली असून, याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. गंजीखाना, ख्रिश्चन समाज व स्पोर्टस् कॉम्प्लेक्स व स्विमिंग टँकसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
पालिकेची विशेष सभा घेऊन विरोध करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री जयंत पाटील यांना भेटून संबंधित जागा पुन्हा पालिकेकडे वर्ग करण्यात येईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, नितीन झंवर, दिलीप वग्याणी, रघुनाथ जाधव, संग्राम फडतरे, धैर्यशील शिंदे, मनीषा जाधव, सतीश माळी उपस्थित होते.