डीपीडीसी निधी वाटपाचा मुद्दा तापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:26+5:302021-03-13T04:49:26+5:30
फोटो ओळी : जिल्हा नियोजनच्या निधीचे समन्यायी वाटप करावे, यासाठी शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या मारत घोषणाबाजी केली. यावेळी ...

डीपीडीसी निधी वाटपाचा मुद्दा तापला
फोटो ओळी : जिल्हा नियोजनच्या निधीचे समन्यायी वाटप करावे, यासाठी शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या मारत घोषणाबाजी केली. यावेळी विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी, संदीप आवटी, अजिंक्य पाटील, ऊर्मिला बेलवलकर, सोनाली सागरे, नसीम शेख उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा नियोजन समितीतून मंजूर सात कोटीच्या निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. निधी वाटपाचा फेर ठराव करण्याची मागणी करीत याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी सांगितले.
जिल्हा नियोजनच्या सात कोटींचा निधी भाजपच्या माजी महापौरांनी मर्जीतील नगरसेवकांनाच दिल्याच्या आरोपावरून सध्या पालिकेतील वातावरण चिघळले आहे. तत्कालीन महापौरांच्या या निर्णयाविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन छेडले होते. शुक्रवारी सभागृह नेते विनायक सिंहासने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी स्थायी सभापती संदीप आवटी, अजिंक्य पाटील, निरंजन आवटी, ऊर्मिला बेलवलकर, नसीम शेख, सोनाली सागरे, संजय यमगर, लक्ष्मण नवलाई यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मारला. यावेळी नगरसचिवाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत विनायक सिंहासने म्हणाले की, महासभेत सर्वच सदस्यांना निधी वाटपात न्याय देण्याचा निर्णय झाला होता. पण, काही सदस्यांना ५० ते ८० लाखांचा निधी दिला आहे, तर अनेकांना एक रुपयांचाही निधी मिळालेला नाही. नगरसचिवांनी महासभेच्या निर्णयानुसार ठराव केलेला नाही. या वादाला तेच जबाबदार आहेत. याविरोधात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
चौकट
भाजपच्या २२ नगरसेवकांना ठेंगा
भाजपच्या सत्ताकाळात आलेल्या सात कोटींच्या निधीत स्वपक्षाच्याच २२ नगरसेवकांना ठेंगा दाखविण्यात आला आहे. सभागृह नेते विनायक सिंहासने, ऊर्मिला बेलवलकर, सोनाली सागरे, लक्ष्मण नवलाई, गीताजंली ढोपे-पाटील यांच्यासह अनेकांची कामे वगळली आहेत. एका प्रभागात एका नगरसेवकांच्या कामाचा समावेश करून उर्वरित तिघांना मात्र एक रुपयाचाही निधी दिलेला नाही. त्यामुळे भाजपमध्येच मोठा असंतोष आहे.
चौकट
काहीजणांवर मेहेरनजर
सात कोटींच्या निधीत काही मोजक्याच नगरसेवकांवर मेहेरनजर दाखविण्यात आल्याचा आरोप सिंहासने यांनी केला. यामागे माजी महापौरांचाही हात असल्याचे सांगत प्रभाग ९ मध्ये ८० लाख, तर महापौरांच्या वार्डात १ कोटी ३५ लाखांची कामे प्रस्तावित केली आहे. मर्जीतील काही नगरसेवकांना ५० लाखांपर्यंत निधी दिला असल्याचेही ते म्हणाले.