इस्लामपूरची कबड्डी जाणार डिस्कव्हरीवर
By Admin | Updated: May 10, 2016 02:24 IST2016-05-10T02:17:03+5:302016-05-10T02:24:46+5:30
रोमांचक इतिहास दाखविणार : इस्लामपूर व्यायाम मंडळाची यशोगाथा

इस्लामपूरची कबड्डी जाणार डिस्कव्हरीवर
इस्लामपूर : महाराष्ट्राच्या मातीने जन्म दिलेल्या पूर्वीच्या हुतूतू आणि आताच्या कबड्डीने डिस्कव्हरी चॅनेलचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रो कबड्डी, महाकबड्डी लीगमुळे प्राप्त झालेल्या वैभवशाली ग्लॅमरमुळे आता डिस्कव्हरी चॅनेलवर हुतूतू ते कबड्डीचा रोमांचक इतिहास दाखविला जाणार आहे. तीन आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू निर्माण करणाऱ्या इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावरील कबड्डीची यशोगाथा डिस्कव्हरीच्या कॅमेऱ्यात टिपली गेली आहे.
देशपातळीवरील प्रो कबड्डी आणि राज्यातील महाकबड्डी लीगमुळे कबड्डी खेळाला लोकाश्रयासह राजाश्रय मिळाला. क्रिकेटपेक्षा जास्त चाहते लाभले. त्यामुळे कबड्डी घरा—घरात पोहोचली. गल्ली-बोळातून कबड्डीचा दम पुन्हा घुमू लागला. त्यामुळे सगळीकडे कबड्डीमय वातावरण निर्माण झाले. कबड्डी हा आता हौशीपणाने खेळण्याचा खेळ राहिला नसून, तो आता
आयुष्याची रोजीरोटी आणि मान-सन्मान मिळवून देणारा खेळ झाला आहे.
त्यामुळेच प्रत्येक बाबीचे अत्यंत बारकाईने आणि शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करणाऱ्या डिस्कव्हरी चॅनेलने कबड्डीचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई येथील कॅमेरामन विपीन चौरासिया (राजस्थान), पथक प्रमुख कु. इसिका बासू (हरियाणा) आणि निखिल टंडन या सहायकांनी इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावर हजेरी लावून हे चित्रीकरण केले. या चमूला जुन्या काळातील कबड्डी ते आताची प्रो कबड्डी असा कबड्डीचा प्रवास दाखवायचा आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार व्यायाम मंडळाच्या कबड्डीपटूंनी फक्त हाफ स्पोर्ट पँट परिधान करुन उघड्या अंगाने कबड्डी खेळायला सुरुवात केली.
सकाळी ९ ला सुरु झालेला हा चित्रीकरणाचा सिलसिला दुपारी १ वाजेपर्यंत तळपत्या उन्हात सुरु होता. कॅमेरामन विपीनने पाच टप्प्यात चित्रीकरण केले. खेळाडूंच्या शरीराच्या हालचाली, त्यांचा पदन्यास, चेहऱ्यावरचे राकट हावभाव, एकमेकांविरुध्दचा त्वेष अन् जोश, मैदानावरील उडणाऱ्या मातीचे लोट, घामाने थबथबलेले आणि मातीने माखलेले शरीर अशा विविध अंगांनी हे चित्रीकरण करण्यात आले. जूनच्या पहिल्या आठवड्यात याचे प्रक्षेपण होणार आहे. त्यावेळी इस्लामपूरचे खेळाडू जगभर पोहोचतील आणि त्याची नोंद व्यायाम मंडळाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी होईल.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पोपट पाटील, मानसिंग पाटील, आनंदराव वडार, सतीश मोरे, प्रा. संदीप पाटील यांचा ऊर अभिमानाने भरुन आला आहे. (वार्ताहर)
इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावर सुरू असलेले कबड्डीचे चित्रीकरण.